इगतपुरीत गारांचा पाऊस, रब्बीच्या पिकांसह बळीराजाच्या स्वप्नांचा झाला चिखल
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात गारांचा पाऊस पडला आहे. त्यामुळे खरीपाच्या धक्क्यातून सावरत असतांना रब्बीने पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे.
शैलेश पुरोहित, टीव्ही 9 मराठी, इगतपुरी ( नाशिक ) : सोमवारी मध्यरात्री नाशिक जिल्ह्यातील ( Nashik News ) बहुतांश ठिकाणी सोसाट्याचा वारा पाहायला मिळाला. मात्र, इगतपुरी तालुक्यात मध्यरात्री गारांचा पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोमवारी मध्यरात्री आलेल्या अवकाळी पावसाने ( Unseason Rain ) होत्याचे नव्हते केले आहे. रब्बीच्या पिकांचा अक्षरशः चिखल झाला आहे. रब्बी हंगामासह काढून ठेवलेला शेतमाल देखील यामध्ये भिजून त्याचा चिखल झाल्याने तोंडचा घास गेल्याची परिस्थिती बळीराजाची झाली आहे. गारांचा पाऊस झाल्याने शेतात असलेला शेतमाल सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने घातलेले हे थैमान बळीराजाच्या डोळ्यात अश्रु आणणारे आहे.
सोमवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाच्या दरम्यान गारांचा पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप पिकांबरोबर रब्बीचे पीकही शेतकाऱ्यांच्या पदरी निराशाच देणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका पुन्हा एकदा बसला आहे.
रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या कांद्यासह गहू, मूग, हरभरा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये काही शेतकऱ्यांनी कांद्याची पोळ करून ठेवली होती, तर काही पिके ही काढणीला आली होती ती देखील झोडपून निघाली आहे. तर काही पिके अजूनही पाण्यात आहे.
काही तासांच्या पावसात शेतात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. अद्यापही पाण्याचा निचरा न झाल्याने मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याशिवाय गारांचा पाऊसही झाल्याने रब्बीचे पीक हातातून जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
रविवारी दिवसभर असलेला उन्हाचा तडाका आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी झालेला मुसळधार पासून याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले आहे.
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील गावांना याचा मोठा फटका बसला आहे. कुऱ्हेगाव,गोंदे दुमाला, मुंढेगाव, अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे,नांदुरवैद्य या गावात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून भरपाई मिळावी अशी मागणी करू लागले आहे.
बहुतांश ठिकाणी काढणीला आलेले गहू हे जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे गहू काढणीचा खर्च वाढणार आहे. आधीच खरीपाच्या पिकांचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा रब्बीचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. एकूणच नाशिकच्या शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे.