सरकारकडून मिळाली नाही मदत, कर्ज घेऊन सुरू केली फळबाग, आता असे वाढले उत्पन्न
प्रभू शर्मा यांना कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्याकडून कर्ज घेऊन फळबाग लागवड केली.
नवी दिल्ली : शेतकरी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक शेती करत आहे. आंबा, पेरू, डाळिंब, आवळा, सफरचंद, पपईसह अन्य भाजीपाला लागवड करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडत आहे. काही शेतकरी फळबागेमुळे गरिबीतून बाहेर पडले. बेगुसराय येथील सांख पंचायतीमध्ये प्रभू शर्मा राहतात. त्यांनी मेहनत करून स्वतःचे आर्थिक उत्पन्न वाढवले. पपई आणि हिरव्या भाजीपाल्याच्या शेतीतून अधिक उत्पन्न मिळत आहे. प्रभू शर्मा म्हणाले, ते आधी पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. त्यातून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यांना सरकारी मदत मिळाली नाही. प्रभू शर्मा यांना कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्याकडून कर्ज घेऊन फळबाग लागवड केली.
खर्च ४० हजार रुपयांचा
त्यांनी पपई, भेंडी आणि वांग्याची लागवड केली. सुरुवातीला त्यांना ४० हजार रुपयांचा खर्च आला. परंतु, उत्पन्न वाढले. नफा चांगला झाला. भाजीपाला हा चांगला व्यवसाय आहे. पण, कधीकधी कीड लागू शकते. त्यामुळे हा धोका स्वीकारून करण्याचा व्यवसाय आहे. पण, योग्य पद्धतीने कीटकनाशकांचा वापर करून रोगापासून बचाव करता येतो.
एका गुंठ्यातून दोन लाखांचे उत्पन्न
प्रभू शर्मा म्हणाले, पपई विक्री करून त्यांनी १ लाख ८० हजार रुपये प्राप्त केले. भाजीपाला विकून ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले. एक गुंठा जमिनीतून त्यांनी दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. आता दुसरे शेतकरी त्यांच्याकडून आधुनिक शेतीच्या टिप्स घेत आहेत.
या फायद्यामुळे प्रभू शर्मा यांचे कुटुंबीय खूश आहेत. योग्य निगा राखल्यास भाजीपाल्याचे उत्पन्न चांगले होते. छोटी रोपे असल्यामुळे काळजी घ्यावी लागते. बारकाईने नजर ठेवल्यास येणाऱ्या रोगाला प्रतिबंध लावता येतो. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. शेतकऱ्यांनी शेतात वेगवेगळे प्रयोग केल्यास नक्कीच यश मिळेल. कारण शेतकरी हाच खरा शास्त्रज्ञ आहे. पण, तांत्रिक मार्गदर्शनाअभावी तो माघारला आहे.