खुशखबर..! ‘ती’ 25 टक्के रक्कमही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर, काय आहे सरकारचा आदेश?
अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मुख्य पीक असलेल्या सोयाबीनला सर्वाधिक फटका बसला होता. तर सर्वच पिकांच्या उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे पीक पाहणी, पंचनामे आणि कृषी विभागाच्या नुकसानीच्या अहवालानंतर राज्य सरकारने आर्थिक मदतची घोषणाही केली. पहिल्या टप्प्यात मंजूर निधीपैकी 75 टक्के निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. मात्र, उर्वरीत 25 टक्के निधीसाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी आंदोलन, मोर्चे काढण्याची नामुष्की ओढावली होती.
उस्मानाबाद : अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे (Kharif Season) खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मुख्य पीक असलेल्या सोयाबीनला सर्वाधिक फटका बसला होता. तर सर्वच पिकांच्या उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे पीक पाहणी, पंचनामे आणि (Agricultural Department) कृषी विभागाच्या नुकसानीच्या अहवालानंतर राज्य सरकारने आर्थिक मदतची घोषणाही केली. पहिल्या टप्प्यात मंजूर निधीपैकी 75 टक्के निधी (Farmer) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. मात्र, उर्वरीत 25 टक्के निधीसाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी आंदोलन, मोर्चे काढण्याची नामुष्की ओढावली होती. अखेर या 25 टक्के निधीबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात 234 कोटी रुपये मिळाले होते तर आता 74 कोटी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागणार आहे. आता दोन-तीन दिवसांमध्ये ही रक्कम प्रशासनाकडे जमा झाल्यानंतर लागलीच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले आहे.
खरिपात 3 लाख 25 हजार हेक्टर बाधित क्षेत्र
निसर्गाचा लहरीपणा काय असतो याचा प्रत्यय यंदा शेतकऱ्यांना आलेला आहे. खरिपात सुरु झालेला पाऊस आता रब्बी हंगामातही अधून-मधून सुरु आहे. पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील 3 लाख 12 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले होते. एवढेच नाही तर नदीकाठच्या शेतजमिनीही खरडून गेल्या होत्या. सर्वाधिक नुकसान हे सोयाबीनचे झाल्याने यातून सावरण्यासाठी राज्य सरकारने हेक्टरी 10 हजाराची मदत केली होती. याचाच आधार शेतकऱ्यांना होता. मात्र घोषणेप्रमाणे मदतही एकरकमी मिळालेली नव्हते. अखेर साडेतीन महिन्यानंतर ही आर्थिक मदत देण्याचा निर्णय झाला आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अन् लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश
खरीप हंगामात उत्पादनापेक्षा अधिकचे पैसे हे शेतकऱ्यांनी जमिनीत गाढले होते. मात्र, सर्वकाही नुकसानीचे झाले होते. असे असताना राज्य सरकारने तातडीच्या मदतीची घोषणा केली मात्र, प्रत्यक्ष वाटपाकडे दुर्लक्ष झाले. दोन महिन्याने पहिल्या टप्प्यातील रक्कम ही दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमाही झाली. मात्र, घोषणेच्या 75 टक्केच रक्कम वितरीत करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलने केली तर शेतकऱ्यांना पैशाची किती गरज आहे हे लोकप्रतिनीधी यांनी दाखवून दिल्याने ही रक्कम मिळालेली आहे.
आता वेळ लागणार नाही
राज्य शासनाकडून आता निर्णय तर झाला आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवासांमध्ये हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. कारण बॅंक खाते आणि इतर बाबींची तपासणी यापूर्वीच झालेली आहे. त्यामुळे आता उशिर होणार आहे. चार दिवसांमध्ये ही रक्कम जमा होताच वितरीत केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या :
Photo : शेतकऱ्याच्या स्वप्नांचा चुराडा, शॉर्टसर्किटमुळे अडीच एकरातील ऊस भस्मसात