Beed : परतीच्या वाटेवर असणारे उसतोड मजुर घरी परतलेच नाहीत, नेमके बीडमध्ये झाले तरी काय?
ऊस तोडीनंतर हिशोब करुन हे पैसे मुकादमाला देण्याचे ठरले पण हंगाम संपल्यानंतरही मजुरांकडेच पैसे फिरले. पैशाची मागणी करीत दत्ता गव्हाणे यांनी लेकराबाळासह 14 जणांना डांबून ठेवले होते.
बीड: (Sugarcane Sludge) ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून आता उसतोड (Sugarcane Worker) मजुरांनी परतीचा वाट धरली आहे. यंदा दोन महिन्याने हंगाम लांबल्याने मजुरांची पावले ही गावाकडे ओढ घेत होती. असे असतानाही (Beed District) बीड जिल्ह्यातील मजूर हे आपल्या गावी परतले नाहीत. त्यांच्याकडे पैसे थकीत असल्याने एका मुकादमाने त्यांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. तब्बल 14 जणांना 8 दिवसांपासून डांबून ठेवल्याचे समोर आले आहे. कारखाना बंद झाल्यानंतरही संबंधित मुकादमाचे पैसे हे या उसतोड मजुरांकडे फिरत होते. त्यामुळे मुकादमाने पैशाची मागणी करीत 14 मजूरांना डांबून ठेवले होते.
8 दिवसांपासून एकाच खोलीत मजूर
ऊस तोडणीसाठी मजूर हे मुकादमाकडून अॅडव्हान्स म्हणून पैसै घेतात. त्याच अनुशंगाने गेवराई तालुक्यातील मजुरांनी दत्ता गव्हाणे या मुकादमाकडून पैसे घेतले होते. ऊस तोडीनंतर हिशोब करुन हे पैसे मुकादमाला देण्याचे ठरले पण हंगाम संपल्यानंतरही मजुरांकडेच पैसे फिरले. पैशाची मागणी करीत दत्ता गव्हाणे यांनी लेकराबाळासह 14 जणांना डांबून ठेवले होते. सर्व मजूर हे गेवराई तालुक्यातील आहेत.
पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
गाळप हंगाम संपल्यानंतर 4 दिवसांमध्ये मजूर गावी परत येणे अपेक्षित होते. पण आठ दिवसाचा कालावधी लोटला तरी हे परतले नसल्याचे मजुरांच्या नातेवाईकांना कळाले. त्यानंतर कारखान्याकडे चौकशी केली असता सर्व मजूर हे गावी परत गेल्याचे सांगण्यात आले मात्र, मुकदमानेच पैशासाठी त्यांना डांबून ठेवल्याची तक्रार मजुरांच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे केली आहे. त्यामुळे आता या घटनेमागे नेमकं दडलंय काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
असा होतो ऊस तोडणीचा व्यवहार
हंगामाच्या सुरवातीला मुकादमाला मजूर मिळणे तसे जिकिरीचे काम असते. मात्र, साखर कारखान्यासोबत मुकादमाने व्यवहार केलेला असल्याने ऊसतोड तर करावीच लागणार आहे. त्यामुळे मुकादम हे ऊसतोड मजुरांना उचल म्हणून तोडणी करण्यापूर्वीच पैसे दिले होते. आता दत्ता गव्हाणे हे मजुरांना पैसे देत गेले. आता हंगाम संपल्यानंतर ही बाब समोर आली आहे. मजुरांकडेच पैसे फिरत असल्याने त्यांना चक्क आठ दिवस डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.