बंगल्यावर मॉर्निंग वॉक… नारळाच्या झाडावर लपंडाव… आणि निलगिरीच्या झाडावर बिबट्याची मस्ती…
शेतात काम करणाऱ्या शेतकरी कुटुंबाला विशेषतः या बिबट्याची मोठी धडकी भरली असून शेतात काम करण्यासाठी मजूर देखील उपलब्ध होत नाहीये.
नाशिक : आला रे आला बिबट्या आला…अशी वारंवार म्हणण्याची वेळ नाशिकच्या ग्रामीण (Nashik Rural) भागातील नागरिकांवर आली आहे. दररोज ग्रामीण भागातून बिबट्याने (Leopard) दर्शन दिल्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर (Social Media) दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी नारळाच्या झाडावर दोन बिबट्यांची मस्ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. याच व्हिडिओला काही तास उलटत नाही तोच बिबट्याच्या थेट एका बंगल्याच्या टेरेसवर मॉर्निंग वॉक सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर आला. याच व्हिडिओ 12 तास देखील उलटलेले नसतांना निलगिरीच्या झाडावर बिबट्याचा लपंडाव सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हे सर्व व्हिडिओ शेतात काम करणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांनी काढून शेयर केले आहे.
नाशिकच्या ग्रामीण भागात सध्या बिबट्याचा मोठा वावर असल्याचे दिसून येत आहे, सिन्नर परिसरात तर दररोज कुणालातरी एकाला दिसतोच आहे आणि त्याचा व्हिडिओ देखील शेयर होत आहे.
शेतात काम करणाऱ्या शेतकरी कुटुंबाला विशेषतः या बिबट्याची मोठी धडकी भरली असून शेतात काम करण्यासाठी मजूर देखील उपलब्ध होत नाहीये.
बिबट्याचा वाढता वावर बघता वनविभागाने सिसिटीव्ही कॅमेरे लावत पिंजरे उभे केले आहेत, मात्र तरीही बिबट्याचा वन विभागाच्या हाती लागत नाहीये.
नाशिकच्या सिन्नर परिसरात गेल्या आठवड्यापासून वणविभाग बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्नशील आहे मात्र बिबट्या पिंजऱ्यात येत नसल्याने वनविभागाच्या कामावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
तसेही ग्रामीण भागात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार समोर येत आहे, नाशिकच्या सिन्नर, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड आणि इगतपुरी या भागात बिबट्याचा वावर असल्याने नेहमी घटना घडत असतात.