पुणे : राज्यभरातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज यावा एवढेच नाही तर त्यामुळे पिकांची काय काळजी घेतली जावी याबाबत माहिती मिळावी व अन्य तांत्रिक चुकांमुळे (Farmers) शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून राज्यभरातील 6 हजार ग्रामपंचायतीमझध्ये (Weather Stations) हवामान केंद्र उभारले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 5 हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असेलेल्या (Villages) गावांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगतिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचे योग्य नियोजन करुन उत्पादनात वाढ होईल असा यामागचा उद्देश आहे. या अत्याधुनिक प्रणालीमुळे शेतकऱ्यांना हवेचा अंदाज, वाऱ्याचा वेग, पावसाचे प्रमाण याचा अंदाज बांधता येणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहेच पण होणाऱ्या पावसाची योग्य नोंद नसल्यामुळे देखील अनेक शेतकरी हे मदतीपासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे आता गावनिहाय पावसाचे प्रमाणाची नोंद या हवामान केंद्राच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारीचा विषयच येणार नाही. उलट वेगवेगळ्या बाबींमध्ये या हवामान केंद्राचा फायदाच शेतकऱ्यांना होणार आहे. पाऊस, वारा, अवकाळी यामुळे होणाऱ्या नुकसानीची नोंद ही तंत्रशुध्द पध्दतीने होणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी बैठकी दरम्यान सांगितलेले आहे.
सध्या केवळ महसूल मंडळाच्या ठिकाणीच ही हवामान केंद्र उभारण्यात आलेली आहेत. अशी 2 हजार 118 केंद्र ही अनेक वर्षापूर्वी उभारलेली आहेत. शिवाय यामधील अनेक ही बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे योग्यरित्या तापमानाची ना पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे एकाच मंडळात काही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते तर काही शेतकरी हे मदतीपासून वंचित राहतात. याबाबतच्या तक्रारी ह्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे 5 हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत स्थरावर ही केंद्र उभारली जाणार आहेत. शिवाय ही स्वयंचलित असल्याने याचा अधिकच्या खर्चाचा भारही येणार नाही.
नुकसानभरपाईच्या दरम्यान, विमा कंपन्या ह्या स्कायमेट कडूनच सर्व माहिती घेतात. मात्र, आता ही व्यवस्था मंडळाच्या ठिकाणीच आहे. त्यामुळे तत्परता येत नाही. उद्या ग्रामपंचायत ठिकाणी अशा अत्याधुनिक हवामान केंद्राची उभारणी झाली तरी तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, पाऊस याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे कृषीविषयक सल्लाही शेतकऱ्यांना या माध्यमातून देण्यात येणार आहे. विशेषत: पीक विमा नुकसानभरपाईच्या दरम्यान याचा लाभ होणार असून पहिल्या टप्प्यात राज्यातील 6 हजार ग्रामपंचायतीच्या ठिकाणी याची उभारणी केली जावी अशा सुचना देण्यात आल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगतिले आहे.