गोंदिया : ‘नाफेड’ च्या माध्यमातून जिल्ह्यात सुरु करण्यात आलेले खरेदी केंद्र यंदा चांगलेच चर्चेत राहिले आहेत. एकतर खरेदी केंद्र ही उशिराने सुरु झाले आणि उत्पादनाच्या तुलनेत खरेदीचे उद्दिष्ट कमी ठरवून देण्यात आले होते. हे कमी म्हणून की काय, खरेदी केंद्रावर (Paddy Crop) धान पिकाची विक्री झाली पण वेळेत (Money to farmers) शेतकऱ्यांना चुकारे मिळाले नाहीत. आता ऐन सणासुदीच्या काळात हे चुकारे अदा करण्याचा निर्णय जिल्हा फेडरेशनच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. सोमवारपासून धान पिकाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तर मोठा दिलासा मिळणार आहेच पण अधिकच्या दराचा देखील फायदा होणार आहे. (Rabbi Season) रब्बी हंगामातील धान पिकाचे हे चुकारे असणार आहेत.जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 41 कोटी 91 लाख रुपये फेडरेशनकडे जमा झाले आहेत.
रब्बी हंगामात धान पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे खुल्या बाजारपेठेत दर कमी असल्याने शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावरील हमी भावावरच भर दिला. चुकाऱ्यांसाठी वेळ का लागेना पण अधिकचा दर मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा होती. त्यानुसार खरेदीही झाली. मात्र, 15 दिवसांमध्ये अदा केले जाणारे बील तब्बल तीन महिने उलटून गेले तरी शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते. अखेर सोमवार 01 ऑगस्टपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची जिल्हा फेडरेशनकडील पायपीटही थांबणार आहे.
रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे ४१ कोटी ९१ लाख रुपयांचे चुकारे मागील दोन-तीन महिन्यांपासून थकले होते. यामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम संकटात आला होता,अखेर थकीत चुकाऱ्यांसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला शनिवारी निधी प्राप्त झाल्याने सोमवारपासून थकीत चुकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास प्रारंभ केला जाणार आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत शेतकऱ्यांना मिळणार आहे.
केंद्रावर धान पिकाची खरेदी झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी शेतकऱ्यांना त्यांचे पैसे द्यावेत असा नियम आहे. यंदा मात्र, अधिकची दिरंगाई झाली आहे. शिवाय केंद्रातील दर आणि खुल्या बाजारपेठेतील दर यामध्ये मोठी तफावत असते म्हणून शेतकरी हे खरेदी केंद्राचाच आधार घेतात. यंदा दोन महिन्यांनी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असले तरी गरजेच्या वेळी मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.