दीड एकर पडीक जमिनीवर ताडीच्या झाडांची लागवड, वर्षाला 8 ते 10 लाखांचं उत्पन्न, नांदेडच्या शेतकऱ्याची यशोगाथा
बिलोली तालुक्यातील नरसी येथील शेतकरी प्रकाश पाटील भिलवंडे या शेतकऱ्याने दीड एकर पडीक जमिनीवर ताडीच्या झाडांची लागवड केली आहे. त्यांनी आपल्या शेतात ताडीच्या बाराशे झाडांची लागवड केली आहे.
नांदेड : बिलोली तालुक्यातील नरसी येथील शेतकरी प्रकाश पाटील भिलवंडे या शेतकऱ्याने दीड एकर पडीक जमिनीवर ताडीच्या झाडांची लागवड केली आहे. त्यांनी आपल्या शेतात ताडीच्या बाराशे झाडांची लागवड केली आहे. त्यातून त्यांना वर्षाला 8 ते 10 लाख रूपयाचे वार्षिक उत्पन्न मिळत आहे. (Nanded Biloli Farmer Neera tree plantation)
ताडीच्या झाडांना कोणतीही मशागत करावी लागत नाही फक्त मुबलक पाणी आणि झाडांचे संगोपन करून शेताच्या बांधावर जरी झाडे लावली तर त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते, अशी माहिती प्रकाश भिलवंडेनी दिली आहे.
नीरा विक्रीतून एकेकाळी नांदेड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असे. जिल्ह्यातील बिलोली, देगलूर, धर्माबाद या तालुक्यांची कोट्यवधी रुपये महसूल देणारे म्हणून ओळख होती. कालानंतराने हळू-हळू झाडांची मोठ्या प्रमाणत कत्तल होत गेली. आता जिल्ह्यात निराची फारशी झाडे राहिली नाहीत. हीच गोष्ट लक्षात घेता तसंच काही आर्थिक गणिते डोळ्यासमोर ठेवून आपण ताडीच्या झाडांची लागवड केल्याचं भिलवंडे यांनी सांगितलं.
नामशेष झालेले ही झाडे शासनाने लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा या शेतकऱ्याने बोलून दाखवली. वनविभाच्या नर्सरीमध्ये ही झाडे वाढवून गरजू शेतकऱ्यांना दिली तर त्यातून शासनाचा महसून वाढेल आणि नीरा व्यवसायाला चालना मिळू शकते. त्यातून अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असं भिलवंडे म्हणाले.
खरं तर नीरा ही आरोग्याच्या दृष्टीने देखील अत्यंत गुणकारी आहे. पहाटेच्या प्रहरी नीरा प्यायल्याने पोटातील अनेक विकार कमी होतात. किडनी स्टोनसाठी तर नीरा अत्यंत गुनकारी मानली जाते. खरं तर प्रत्येक डॉक्टर रुग्णांना नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात त्यापेक्षा ही 10 पट अधिकचे न्यूट्रिशन नीरा मधून मिळत असते अशी माहिती भिलवंडे यांनी दिली.
नदी, नाले, ओढे यांच्या काठावर तसेच हलक्या जमिनीत ताडीची झाडे चांगल्या प्रकारे येतात. या झाडांना चांगल्या प्रतीच्या जमिनीची देखील गरज नसल्याचे भिलवंडे यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी नीरा झाडांची लागवड करावी, असे आवाहन शेतकरी भिलवंडे यांनी केलंय.
(Nanded Biloli Farmer Neera tree plantation)
संबंधित बातम्या
वावरातून फेसबुक-व्हॉट्सअॅप, सीताफळाची थेट ऑर्डर, नांदेडच्या शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग