Red Chili : धर्माबादी लाल मिरचीचा तोरा कमी; बांगलादेशातील परिस्थितीचा मोठा फटका, भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत
Dharmabad red chili Price down : देश विदेशात मागणी असलेल्या धर्माबादच्या मिरची'चे भाव कमी झाले आहेत. बांगलादेशातील परिस्थितीचा नांदेडमधील मिरचीला फटका बसला आहे.
नांदेडच्या धर्माबाद येथील लाल मिरची ही देशातच नव्हे तर विदेशातही प्रसिध्द आहे. आखाती देशातही इथल्या मिरचीला मोठी मागणी आहे. लाल मिरची ही तिखट असते. पण सध्या मात्र ग्राहकांसाठी मिरची ही गोड झाली आहे. याचे करण म्हणजे मिरचीचे भाव कमी झाले आहेत. क्विंटल मागे 4 हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे उत्पादक आणि व्यापार्यांना कोटींचा फटका बसला आहे. बांगलादेशातील परिस्थितीचा पण या मिरचीला फटका बसला आहे.
आयात झाली बंद
बांगलादेशातील परिस्थितीचा फटका नांदेडच्या मिरची व्यापार्यांना बसत आहे. बांगलादेशकडून नांदेडच्या धर्माबाद येथील मिरची आयात केली जात होती. परंतु आता ही आयात बंद झाली आहे. मिरचीची आवक वाढली आहे. परिणामी लाल मिरचीचे भाव कमी झाले आहेत. क्विंटलमागे 4 हजारांची घसरण झाली असून भविष्यात आणखी दर कमी होण्याची भीती व्यापार्यांनी व्यक्त केली आहे.
मिरचीचा भाव उतरला
लाल मिरचीचा रोजच्या जेवणात मोठा वापर होतो. तीन महिन्यांत लाल मिरचीचे भाव प्रकार आणि गुणवत्तेनुसार क्विंटलमागे घसरले आहेत. क्विंटलमागे भावात 50 ते 850 रुपयांचा फटका बसला आहे. उत्पादक आणि व्यापार्यांना मोठा फटका बसला आहे. या मिरचीने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहे.
मिरचीचे हे प्रकार तुम्हाला माहिती आहेत का?
मिरचीच विविध प्रकर आहेत. चपाटा, गुंटूर, लवंगी हे लोकप्रिय प्रकार आहेत. तर धर्माबादी, रसगुल्ला, ब्याडगी आणि काश्मिरी या प्रकारांना पण किचनमध्ये मोठी मागणी आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत या प्रकारात मिरचीचे दर खूप कमी झाले आहे. रसगुल्ला मिरची गेल्यावर्षी 1000-2000 रुपये होती. हाच भाव या वर्षी 350 ते 400 रुपयांपर्यंत घसरला आहे.
नवीन लाल मिरची पुढील महिन्यात
नवीन लाल मिरचीची आवक फेब्रुवारी महिन्यात सुरू होईल. फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्या दरम्यान मिरीची बाजारात मोठी उलाढाल होते. गेल्या 3 महिन्यात लाल मिरचीचे भाव मोठ्या प्रमाणात घसरल्याने व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नवीन हंगामाच्या सुरुवातीलाच भाव घसरल्याने त्यांची चिंता वाढली आहे.