वादळी पावसात टरबूज, खरबूज गळून पडले; या कवडीमोल भावात करावी लागतेय विक्री
बाजार भाव नसल्याने डांगर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. डांगर आणि टरबूजला प्रति किलो तीन ते पाच रुपयाचा भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.
नंदुरबार : जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा फटका टरबूज आणि खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसला. काही ठिकाणी तुरळक गारपिटीमुळे फळांना तडे गेले आहेत, तर दुसरीकडे बाजारपेठेत दरही कमी झाल्याने शेतकरी अडचणी सापडला आहे. दुष्काळात तेरावा महिना या म्हणीची प्रचिती नंदुरबार जिल्ह्यातील डांगर आणि टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना येत आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे टरबूज आणि डांगर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फळांना तडे जात असून शेतकऱ्यांना फळे फेकल्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. असं प्रफुल पाटील यांनी आपली व्यथा सांगितली.
टरबूज, खरबूजला तीन ते पाच रुपये किलोला भाव
ढगाळ वातावरणामुळे टरबूज आणि डांगरच्या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फळे विक्रीसाठी तयार आहेत. मात्र बाजार भाव नसल्याने डांगर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. डांगर आणि टरबूजला प्रति किलो तीन ते पाच रुपयाचा भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी पूर्णता उद्ध्वस्त झाला आहे. अस्मानी संकटाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना आता दर कमी झाल्याने या दुसऱ्या सुलतानी संकटाचाही सामना करावा लागत आहे.
मिरचीला मिळावा हमीभाव
राज्यातील शेतकरी मोठा आर्थिक अडचणीत सापडला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला घास निसर्ग राजांनी हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडले आहे. दुसरीकडे शेती पिकांना कवडीमोल भाव मिळत आहे. त्यासाठी राज्य सरकार आता कापूस, द्राक्ष, कांदा या पिकांना हमीभाव देण्यासाठी विचार करत आहे. मात्र मिरचीला देखील भाव नाही आहे. त्यामुळे मिरचीला देखील हमीभाव मिळावा अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केली आहे.
नंदुरबार जिल्हा हा देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या मिरचीच्या बाजारपेठ आहे. जिल्ह्यात दरवर्षी दोन लाख पेक्षा अधिक मिरचीची लागवड केली जात असते. मात्र मिरचीला हमीभाव मिळत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी देखील अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कापूस, कांदा, द्राक्ष या पिकाप्रमाणे देखील मिरचीला हमीभाव मिळावा शेतकऱ्यांनी देखील मागणी केली आहे. शासनाने मिरची उत्पादक शेतकऱ्यांचे देखील विचार करावा. मिरचीला हमीभाव ठरवून मिळावा एवढीच अपेक्षा आहे.