Red Chilly : नंदुरबारच्या बाजारपेठेत ‘तेजा’ मिरचीची ची तेजी, तब्बल 200 एकरात लाल मिरचीचे वाळवण
नंदुरबार ही देशातील चौथ्या क्रमांकाची मिरची बाजारपेठ आहे. जिल्हाभरातून तसेच परराज्यातूनही मिरचीची आवक वाढत आहे. इतर तिन्हीही मार्केटमध्ये पावसामुळे माल खराब झाला असल्याने येथील मार्केटमध्ये चांगल्या दर्जाची मिरची दाखल झाली आहे. काळाच्या ओघात येथील मिरची वाणही बदलले आहे. आता पारंपारिक मिरचीची जागा तेजा मिरचीने घेतलेली आहे.
नंदुरबार : नंदुरबार ( Nandurbar Chilly Market) ही देशातील चौथ्या क्रमांकाची मिरची बाजारपेठ आहे. जिल्हाभरातून तसेच परराज्यातूनही मिरचीची आवक वाढत आहे. इतर तिन्हीही मार्केटमध्ये पावसामुळे माल खराब झाला असल्याने येथील मार्केटमध्ये चांगल्या दर्जाची मिरची दाखल झाली आहे. काळाच्या ओघात येथील मिरची वाणही बदलले आहे. आता पारंपारिक मिरचीची जागा तेजा मिरचीने घेतलेली आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच नंदुरबार येथे (chilly) मिरचीला योग्य दर मिळाल्याने आवकही सुधारत आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीलगतच्या तब्बल 200 एकरामध्ये लाल मिरचीची पसरण असून मिरची सुकावण्यासाठी ठेवण्यात आली आहे तर याच परिसरात मिरची खुडणीचे कामही केले जात आहे.
शंकेश्वराची जागा घेतली ‘तेजा’ मिरचीने
नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत शंकेश्वर जातीच्या मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. आता मात्र, यामध्ये बदल होत आहे. या मिरचीचे उत्पादन घटत असून आता जिल्ह्यात तेजा, व्हीएनआर, अरुणीम, कळस, लाली या वाणांच्या मिरचीची लागवड केली जात आहे. आतापर्यंत नंदुरबार येथील बाजारपेठेत 1 लाख 50 हजार क्विंटल मिरचीची आवक झालेली आहे. शिवाय दिवसेंदिवस मिरचीच्या आवकमध्ये वाढ होत आहे.
नंदुरबारच्या बाजारपेठेत सर्वाधिक दर
नंदुरबार जिल्हा तसेच लगतच्या गुजरात आणि इतर राज्यांमधून येथील बाजारपेठेत आवक सुरु आहे. शिवाय लाल मिरचीला प्रति क्विंटल 3 हजार 500 पेक्षा अधिकचा दर मिळत आहे. या भागातील मिरचीचा रंग आणि चवीसोबत गंधासाठीही येथील मिरची प्रसिध्द आहे. हंगामाच्या सुरवातीपासून आवक मोठ्या प्रमाणात असताना एकदाही दर घटले नाहीत हे विशेष. त्यामुळे शेतकरी नंदुरबाच्या बाजारपेठेकडे आकर्षित होत आहेत. तब्बल 20 दिवस सुक्या मिरची ही ऊन्हात वाळवल्यानंतर शहरातीलच मिरची पावडरचे होलसेल उत्पादक खरेदी करतात.
मजुरांच्या हातालाही काम
बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लाल मिरचीची आवक सुरु आहे. सुकी असलेली मिरची हा वाळवली जात आहे. दरम्यान, याच कालावधीमध्ये मिरची खुडण्याचे कामही केले जाते. त्यामुळे परिसरातील महिला मजूरांच्या हाताला कामही मिळत आहे. 40 किलो मिरचीचे देठ खुडल्यानंतर 60 रुपये मजुरी दिली जात आहे. एक महिला दिवसाला सरासरी 200 किलो मिरची खुडते. गेल्या अनेक दिवसांपासून हेच समीकरण असून मजूरांच्या हाताला कायमचे काम मिळालेले आहे.