नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. या वारंवार होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची पुरती वाट लागली आहे. त्यातच एक आठवड्यापासून पाऊसाने उघडीप घेतल्याने दिलासा मिळाला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. त्यातच पुन्हा एकदा बहुतांश ठिकाणी पाऊस होऊ लागला आहे. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी आज दुपार पासून मुसळधार पाऊस पडू लागला आहे. अचानक आलेल्या अवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांची पुन्हा झोप उडाली आहे. खरंतर शेतात जास्तीची पिके नसली तरी गहू आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान होणार आहे.
यामध्ये नाशिक जिल्ह्याला खरंतर हवामान विभागाने ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तवला होता. त्या अंदाजानुसार आज दुपारी इगतपुरी तालुक्यात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अचानक आलेल्या पावसाने शेतकरी वर्गाची मोठी तारांबळ झाली असून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
खरंतर राज्यातील बहुतांश ठिकाणी आणि उपनगरासह गुजरातला नाशिकवरुन मोठ्या प्रमाणात भाजीपाला जात असतो. त्यामध्ये अशा अवकाळी पाऊसामुळे शेतकरी वर्गाचं मोठं नुकसान होणार आहे. दिवसभर कडाक्याचे ऊन आणि त्यानंतर पाऊस पडल्याने भाजीपाल्यावर करपा येण्याची शक्यता असते.
त्यात काही ठिकाणी पिके काढून ठेवलेली असतात. अचानक आलेल्या पावसामुळे ती पिके वाचविण्याची धडपड सुरू होत असते. काही ठिकाणी उन्हाळ कांदे अजून काढण्यास आलेले नाही. काही ठिकाणी गहू काढून पडलेला आहे. तर काही ठिकाणी भाजीपाला खराब होण्याची शक्यता आहे. यामध्ये पालेभाज्या पिवळ्या पडण्यास सुरुवात होत असते.
एकूणच अशा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात या अवकाळी पावसामुळे होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे भाजीपाल्याचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्याने भाव देखील वाढण्याची शक्यता आहे.
नाशिक शहरातील विविध भागात मुसळधार पाऊस पडला आहे. अवघे काही मिनिटे आलेल्या पावसाने व्यावसायिकांची मात्र मोठी तारांबळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. हातविक्री करण्याऱ्या व्यावसायिकांना याचा फटका बसत असतो. त्यामुळे भर उन्हाळ्यात येणाऱ्या पावसाने अनेकांना धडकी भरवली आहे.
नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामध्ये अनेक शेतकरी उन्हाळ्यात भाजीपाल्याला भाव मिळत असल्याने ते पीक घेतात. मात्र अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चिखल झाला आहे.