नाशिक : नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकळी पावसाचा फेरा आला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले आहे. या सोबतच शेतकऱ्यांच्या घरांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतीसोबतच निवाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील संकटाची मालिका सुरूच असून अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह होणारी गारपीट कधी थांबेल असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील फोपशी गावातील काही घरांचे पत्रे उडून घरांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नसली तरी राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे संसार अक्षरशः रस्त्यावर आले आहे.
नाशिकच्या ग्रामीण भागात शुक्रवार सायंकाळ पासून बहुतांश ठिकाणी झालेल्या अवकाळी पाऊसासह वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काहींचा तर संसारच उघड्यावर आल्याने अवकाळीचा फेरा कधी थांबणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
महत्वाची बाब म्हणजे या संपूर्ण घटनांमध्ये कुठलीही जिवीत हानी झालेली नाही. दिंडोरी तालुक्यात झालेल्या घटणेची प्रशासनाने तात्काळ माहिती घेत पंचनामा केला आहे. यामध्ये दिंडोरी तहसिलदार पंकज पवार यांनीही पाहणी करून लवकरात लवकर मदत करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासित केले आहे.
दिंडोरी तालुक्यातील फोपशी गावातील वसंत भगवान बागूल या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. ही शेतकरी मळ्यात राहतात. त्यांच्या घरांचे पत्रे उडून गेले नाही तर घराच्या भिंती सुद्धा कोसळल्या आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
खरंतर पत्रे उडल्याचे लक्षात येताच घरातील सर्व व्यक्तींनी बाहेर पळ काढला. जिवाच्या आकांताने पळत आपला जीव वाचविला. मात्र याच वेळेला संपूर्ण घरातील संसार रस्त्यावर आला आहे. पत्रे तर कितीतरी हवेतच असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे डोळ्यासमोर दृश्य पाहून संपूर्ण कुटुंब हादरले आहे.
याशिवाय गुलाब गोविंद पाडवी, रामदास चंदर चौधरी यांच्याही घराचे नुकसान झाले आहे. भीतीची पडझड आणि घराचे पत्रे उडून गेले आहे. त्यामध्ये शेतकाऱ्याचे झालेले नुकसान बघता आत्ताच पुन्हा शेती उभी करायची की घर असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बळीराजा मायबाप सरकारच्या मदतीवर अवलंबून आहे.
.गावातील सरपंच, तलाठी, विभागीय अधिकारी, महसूल अधिकारी यांनी गावात पाहणी करत पंचनामे केले आहे. नुकसान झालेल्या कुटुंबाला तात्पुरता देण्याची प्रक्रिया करण्यात आली असून तात्काळ आर्थिक मदत करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे.