शेती व्यवसाय संकटात असताना नवा प्रयोग केला, पीकही जोमदार आलं होतं, पण अखेरच्या क्षणी निसर्गानं घात केला…
अवकाळी पावसाने द्राक्ष, कांदा, गहू आणि भाजीपाला शेतीनंतर आता टरबूज शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. व्यापऱ्यांनी देखील पाठ फिरवल्याने मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
लासलगाव, नाशिक : खरंतर शेती व्यवसाय हा गेल्या काही वर्षांपासून अडचणीत सापडला आहे. मात्र, तरीही शेतकरी नवनवीन प्रयोग करून दोन पैसे अधिकचे कसे मिळतील यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातच नाशिकचा शेतकरी म्हंटला तर तो प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखला जातो. अस्मानी संकट असू देत नाही तर सुलतानी संकट शेतकरी आपला शेतमाल कोणत्याही परिस्थितीत दोन पैसे कसे मिळतील यासाठी प्रयत्न करत असतो. अखेरच्या क्षणापर्यंत तो लढा देत असतो अशातच मागील आठवड्यापासून अवकाळी पाऊस आणि गारपीटीचं नवसंकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. वादळी वाऱ्यासह ठिकठिकाणी गारपिटीचा पाऊस झाला आहे.
मोठ्या कष्टाने आणि पोटच्या गोळ्या प्रमाणे जपलेल्या पिकाचं मोठे नुकसान झालं आहे. नाशिक जिल्हा तसा द्राक्ष, कांदा, डाळिंब आणि भाजीपाला यासारख्या पिकांमुळे जगभरात ओळखला जातो. मात्र, या पारंपरिक पिकांना फाटा देऊन काही शेतकऱ्यांनी टरबूज शेती केली होती.
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत टरबूज शेती ही उत्तम होती. गारपीटीपासू ही शेती वाचली गेल्याचे दिसून येत होते. आतून भडक लाल आणि चवीला गोड असणारे टरबूज खराब होऊ लागले आहेत. हिरव्या टरबुजावर पांढरे डाग पडू लागले असून टरबूज खराब होत आहे.
गारपीट आणि अवकाळी पावसाचा द्राक्ष कांद्यानंतर आता कलिंगडाच्या शेतीलाही फटका बसल्याचे चित्र समोर आले आहे. निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथील मच्छिंद्र कारभारी टोपे या शेतकऱ्याने शेतात वेगळा प्रयोग करत टरबूज शेती केली होती.
80 ते 90 हजार रुपये खर्च करून एक एकरामध्ये टरबूज शेती फुलवली होती. अचानक झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे टरबुजांना फटका बसल्याने सफेद डाग पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे कलिंगड खराब होण्यास सुरुवात झाल्याने व्यापारी आता कलिंगड घेण्यास तयार होत नाहीये.
हाता तोंडाशी आलेला घास हिरवला आहे. अंदाजे 30 ते 40 टनाच्या दरम्यान टरबूजाचे उत्पन्न निघाले असते. खर्च वजा जाता अडीच ते तीन लाख रुपये मिळाले असते. मात्र, गारपिटीच्या तडाख्याने संपूर्ण पीक वाया गेल्यामुळे काढून फेकण्यासाठी ही मजुर ही उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.
झालेला उत्पादन खर्चही आता निघणार नाहीये अवकाळी पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात बसल्याने पुढील पीक घेण्यासाठी देखील भांडवल शिल्लक नसल्याची स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे मायबाप सरकारने मदत करावी अशी मागणी केली जात आहे.