बळीराजाच्यासाठी चिंतेची बातमी ! जिल्ह्यात ‘या’ दिवशी पावसासह गारपीटीची शक्यता, हवामानाचा अंदाज काय?
बळीराजाची चिंतेत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता वर्तविल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
नाशिक : बळीराजासमोरील चिंता काही केल्या कमी व्हायला तयार नाहीये. मागील दोन्ही आठवड्यात अवकाळी पाऊस तर कधी गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. यामध्ये शासन कर्मचारी संपावर असल्याने अद्याप पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे मदत कधी होणार असा प्रश्न अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर संप मागे घेतल्यानंतरही शेतकऱ्यांचे पंचनामे रखडले गेले आहे. त्यात अनेक ठिकाणी शेतमालाचा सौदा झालेला असतांना व्यापारी कवडीमोल दराने शेतमाल मागत आहे. त्यामुळे बळीराजा कोंडीत पकडला गेला आहे.
बळीराजा दुहेरी संकटात सापडलेला असतांना पुन्हा एकदा राज्यातील काही भागात पाऊस आणि गारपीठ होण्याची शक्यता आहे. इगतपुरी येथील ग्रामीण कृषी हवामान केंद्राने नुकताच एक अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील काही भागात हवामानात बदल होत असतांना अवकाळी पाऊस आणि गारपीटीपासून दिलासा मिळेल अशी स्थिती होती. मात्र, येत्या रविवारी पपुन्हा बळीराजाच्या अडचणीत वाढ होणार आहे. यामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
रविवारपर्यन्त ही स्थिती असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांवर निसर्गाची वक्रदृष्टी असल्याचे पाहायला मिळत आहे. रविवार पर्यन्त सलग ही स्थिती राहण्याची शक्यता आहे. 30 ते 35 दरम्यान तापमान राहणार असल्याचा अंदाज आहे.
दरम्यान शेतकऱ्यावर येणाऱ्या संकटांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे. मागील संपूर्ण आठवड्यात कुठे अवकाळी पाऊस तर कुठे गारपीट झाली होती. त्यामध्ये खरीपाची सर्वच पिके भुईसपाट झाली होती. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
नुकताच नाशिक जिल्ह्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा पाहणी दौरा झाला होता. त्यामध्ये कृषीमंत्र्यांनी अवघ्या काही मिनिटांत पाहणी करून दौरा आटोपता घेतला. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याऐवजी शेतकऱ्यांचा सुनावत पळ काढल्याने शेतकाऱ्यांमध्ये नाराजी होती.
पंचनामे होत नसल्याचे गाऱ्हाणे मांडत असतांना मदतीबाबत कुठेलही ठोस आश्वासन न दिल्याने सरकारच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. त्यातच आता पुन्हा हवामान केंद्राच्या माध्यमातून समोर आलेली माहिती शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. त्यामुळे आता पुन्हा शेतकऱ्यांवर पाऊस आणि गारपीटीचं संकट घोंगावत असल्याने चिंता वाढली आहे.