नव्या गव्हाची बाजारात आवक सुरु, जाणून घ्या सध्याचा क्विंटलचा भाव
यंदाच्यावर्षी गव्हाचं पीक अधिक असल्यामुळे दर कमी होऊ नये अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे, नवा गहू बाजारात यायला सुरुवात
जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : नंदूरबार बाजार समितीत (Nandurbar Market Committee) नव्या गव्हाची आवक सुरु झाली आहे. दररोज सरासरी 800 ते 1 हजार क्विंटल गहू बाजारात येत आहे. आवक कमी असल्याने गहू पीकाला सध्या भाव 2100 ते 3000 रुपये पर्यंत मिळत आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून बाजारात गव्हाची आवक वाढणार असल्याचा सुध्दा अंदाज व्यक्त केला जात आहे. नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामात (Rabi season)गहूचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर होत असतं, रब्बीच्या एकूण क्षेत्रापैकी 70 टक्के क्षेत्र गव्हाचे आहे. यंदा सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता असल्याने, एकूण क्षेत्राच्या तुलनेत गव्हाची पेरणी (Sowing wheat) करण्यात आली होती. आता गहू काढणी सुरू झाली आहे. काही शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी गहू आणायला सुरुवात केली आहे. मात्र गव्हाची आवक वाढल्याने गव्हाचा भाव कमी व्हायला नको, अशी अपेक्षा शेतकरी करू लागले आहेत.
कांद्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणले
कांद्याला सध्या भाव नसल्याने कांद्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणले आहे. मात्र कांद्याला भाव नसताना देखील व्यापारीच्या मात्र यात चांगलाच फायदा होत आहे. कांद्याला बाजार समितीमध्ये चार ते पाच रुपये प्रति किलो दराने व्यापारी विकत घेत आहे. तर व्यापारी आठ ते दहा रुपये प्रति किलोंनी विकत आहे. एकीकडे कांद्याला भाव नसल्याने शेतकरी मोठा अडचणीत सापडला आहे. तर दुसरीकडे किरकोळ बाजारात कांद्याला आठ ते दहा रुपये पर्यंतच्या भाव मिळत असल्याने व्यापाऱ्यांना यात चांगलाच फायदा होताना दिसून येत आहे. सरकार कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी आता विचार करत आहे. मात्र व्यापाऱ्याप्रमाणे शेतकऱ्यांना देखील चांगला भाव मिळावे अशी अपेक्षा बळीराजा करू लागले आहेत.
शेतकऱ्यांना वारंवार शासनातर्फे मुदतवाढ, पण…
नंदूरबार जिल्ह्यातील पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा अपात्र लाभार्थीने लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर महसूल यंत्रणेद्वारे खातेदारांची शेतीविषयक माहिती भरण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक असतानाही जिल्ह्यात अजूनही २० हजार ९०४ शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत ई-केवायसीची पूर्तता झालेली नाही आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख २९ हजार शेतकऱ्यांची तपासणी करण्यात येऊन त्याची माहिती महसूल विभागाने ई-पोर्टलवर भरली जात आहे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी, यासाठी वेळोवेळी आवाहन केले जात असून, अजून शेतकऱ्यांनी केवायसी केलेले नसल्याने या शेतकऱ्यांसाठी आता अडचणी निर्माण होणार आहेत. गेल्या काही महिन्यांत शेतकऱ्यांना वारंवार शासनातर्फे मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र ई-केवायसीची पूर्तता केल्यानंतरच या योजनेचा १३ वा हप्ता शासनातर्फे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे. जे शेतकरी याची पूर्तता करणार नाही, त्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ यापुढे मिळणार नाही, अशी भूमिका शासनाने घेतली आहे.