२४ तासांपासून रांगा लावून उपयोग नाही; धामणगावात शेतकरी का झालेत आक्रमक?
शासनाने २७ फेब्रुवारीपासून नोंदणी करण्याचा जीआर काढला. परंतु, लेखी आदेश आले नाहीत. त्यामुळे आजपासून नोंदणी करण्यात आली नाही. शेतकरी आक्रमक झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे
अमरावती : अमरावतीच्या धामणगाव रेल्वेतील नाफेड केंद्राबाहेर नोंदणीकरिता शेतकऱ्यांनी गेल्या २४ तासांपासून नोंदणी केंद्राबाहेर रांगा लावल्या. मात्र अचानक केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी झाल्याने तारांबळ उडाली. अखेर नोंदणी प्रक्रिया केंद्राला बंद करावी लागली. अमरावतीच्या धामणगाव रेल्वेतील नाफेड केंद्रावर शेतकऱ्यांची तोबा गर्दी उसळली. २४ तासापासून शेतकरी रांगा लावूनही नोंदणी झाली नाही. पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त वाढवावा लागला. अचानक गर्दी वाढल्याने नोंदणी बंद करावी लागली. यावेळी शेतकऱ्यांनी प्रचंड आक्रोश केला. वाढत्या शेतकऱ्यांच्या आक्रोशामुळे नोंदणी प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती खरेदी विक्री व्यवस्थापक मारोती बोकडे यांनी दिली. अचानक नोंदणी रद्द करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आक्रोश केला. जय जवान जय किसान नारेबाजी करीत प्रशासनावर रोष व्यक्त केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
नाफेड केंद्राने नोंदणी प्रक्रिया सुरू करावी किंवा शेतकऱ्यांना लेखी हमी द्यावी याकरिता नाफेड केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. अशी माहिती शेतकरी काका कावडे यांनी दिली. शेतकऱ्यांना नाहक त्रास होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांना वेठीस धरल्या जात असल्याचा आरोप चेतन परडखे यांनी केला. खुल्या बाजारात शेतमालाला योग्य बाजारभाव मिळाला असता, तर ही वेळ शेतकऱ्यांवर आली नसती. गुरुवारी नोंदणी न झाल्यास नोंदणी कार्यालय पेटवून देणार असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चेतन परडखे यांनी घेतली आहे.
या कारणाने झाली गर्दी
राज्यभरात हरभऱ्याच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही नोंदणी तब्ब्ल १५ दिवस उशिरा सुरू झाली. त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेले आहेत. शासनाने २७ फेब्रुवारीपासून नोंदणी करण्याचा जीआर काढला. परंतु, लेखी आदेश आले नाहीत. त्यामुळे आजपासून नोंदणी करण्यात आली नाही. शेतकरी आक्रमक झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. भर उन्हात हे शेतकरी थांबले आहेत. ऑफलाईन फार्म स्वीकारून नंतर त्यांना ऑनलाईन करा, अशी विनंती शेतकरी संघटनेकडून करण्यात आली. यावर अधिकारी विचार करत आहेत. रात्री दहा वाजतापासून शेतकरी येथे रांगेत लागले आहेत.
शासनाचा हमीभाव हा ५ हजार ३०० रुपयांपर्यंत आहे. खासगी बाजारपेठेत चन्याचे दर सातशे ते आठशे रुपये कमी आहेत. दोन पैसे जास्त मिळतील, या अपेक्षेने शेतकरी हमीभावाचीविक्री करत असतो. त्यामुळे आधी नोंदणी करून टोकण घेण्यासाठी शेतकरी आले होते. त्यांची निराशा झाल्याने ते आक्रमक झालेत.