Nandurbar : पावसाची उघडीप शेती कामाला वेग, हातनुर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरुच
सबंध जुलै महिन्यात पावसाची रीपरिप ही सुरुच होती. खरिपात हंगामातील पिकांचा पेरा होताच सुरु झालेला पाऊस सलग महिनाभर सबंध राज्यात कायम होता. त्यामुळे पिकांची वाढ तर खुंटलीच पण पिके अधिक काळ पाण्यात राहिल्याने पिवळी पडू लागली होती. यामुळे खरिपातील उताऱ्यामध्येही घट होणार असल्याची चिंता शेतकऱ्यांना आहे.
नंदुरबार : जुलैप्रमाणेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात (Rain) पावसामध्ये सातत्य राहिले होते. त्यामुळे (Kharif Season) खरीप हंगामातील पिकांवर टांगती तलवार ही कायम होतीच, पण गेल्या चार दिवसांपासून नंदुरबार जिल्हाच नव्हे तर विदर्भातच पावसाने उसंत घेतलेली आहे. पावसाने उघडीप दिल्याने रखडलेल्या शेती कामाला तर वेग आलाच आहे पण पिकांची वाढही होत आहे. शेत शिवराचे असे चित्र असले तरी दुसरीकडे (Hatnur Dam) हातनुर धरणात पाण्याची आवक ही सुरुच आहे. त्यामुळे तापी नदीच्या पाणीपातळीत वाढ ही सुरुच आहे. मात्र, पावसाने उसंत घेतल्याने शेतशिवारात शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज अखेर खरा ठरला असून 15 ऑगस्टपर्यंत पावसाची उघडीप राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्याच्या वातावरणामुळे खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग पिकांची वाढ होत आहे. कोळपणी, खुरपणी आदी कामे वेगात सुरु आहेत.
शेतकऱ्यांना दिलासा, कामांना मोकळीक
सबंध जुलै महिन्यात पावसाची रीपरिप ही सुरुच होती. खरिपात हंगामातील पिकांचा पेरा होताच सुरु झालेला पाऊस सलग महिनाभर सबंध राज्यात कायम होता. त्यामुळे पिकांची वाढ तर खुंटलीच पण पिके अधिक काळ पाण्यात राहिल्याने पिवळी पडू लागली होती. यामुळे खरिपातील उताऱ्यामध्येही घट होणार असल्याची चिंता शेतकऱ्यांना आहे. असे असतानाच आता गेल्या चार दिवसांपासून उघडीप दिल्याने पिकांच्या मशागतीच्या कामांनी वेग धरला आहे. शिवाय ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला होता. आता मशागतीबरोबरच पीक फवारणीचेही काम सुरु आहे.
तापी नदीच्या पाणीपातळीत वाढ
पावसाने उघडीप दिली असली तरी धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सारंगखेडा आणि प्रकाशा धरणातील बॅरेजचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. सारंखेडा येथून 2 लाख 90 हजारने क्युसेकने तर प्रकाशा येथून 2 लाख 79 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत असल्याने तापी नदीच्या पात्रात पाणी पातळीत वाढ होतेय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
मध्यप्रदेशातील पावसाचा परिणाम नंदुरबारवर
नंदुरबार जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असली तरी जळगाव आणि मध्यप्रदेशात सुरु असलेल्या पावसाचा परिणाम थेट जिल्ह्यातील जलसाठ्यांवर होत आहे. यामुळेच धरणामध्ये पाण्याची आवक सुरु आहे. परिणामी सरासरीपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्याने धरणातूनही पाण्याचा विसर्ग हा तापी नदीमध्ये होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे पावसाच्या उघडीपीचा फायदा शेतकऱ्यांना मात्र होत आहे.