गोंदिया : (Paddy Crop) धान पीक उत्पादनापेक्षा उत्पादित झालेल्या पिकासाठी योग्य बाजारपेठ ही शेतकऱ्यांची मोठी अडचण आहे.शिवाय बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची मनमानी बाजूला कऱण्यासाठी विदर्भात (Paddy Procurement Centre) धान खरेदी केंद्र सुरु केली जातात. पण काळाच्या ओघात त्याचेही स्वरुप बदलू लागले आहे. आता धान खरेदीसाठी सुरु कऱण्यात आलेली केंद्र ही उद्दिष्टपूर्ती झाली म्हणून बंदही करण्यात आली. त्यामुळे उर्वरीत धानाचे करायचे काय असा सवाल सध्या शेतकऱ्यांसमोर आहे. खरेदी केंद्र चालक हे नियमांवर बोट ठेवत असले तरी (Farmer) शेतकऱ्यांच्या समस्या ह्या कायम आहेत. शेतकऱ्यांना आता खासगी व्यापाऱ्यांकडेच धानाची विक्री करावी लागणार आहे. यंदा खरेदी केंद्रावरील मर्यादा वाढूनही शेतकऱ्यांच्या समस्या ह्या कायम आहेत. गोंदियातील धान खरेदी केंद्राचे उद्दिष्टपूर्ण झाल्याने ते बंद कऱण्यात आले आहे.
धान पिकाच्या खरेदीसाठी विदर्भात खरेदी केंद्रन उभारण्यात आली पण ती शेतकऱ्यांसाठी नव्हे तर सरकारने आपला कोटा पूर्ण कऱण्यासाठीच असेच म्हणावे लागणार आहे. तळागळातील शेतकऱ्यांचा विचार न करता अवघ्या तीन दिवसांमध्ये उद्दिष्टपूर्ती करुन खरेदी बंद. त्यामुळे खरेदी केंद्रातून सुविधांपेक्षा अडचणी अधिक झाल्या आहेत. केंद्र संचालकांना धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार केंद्र चालकांनी लगतच्या शेतकऱ्यांचेच धान खरेदी करुन घेतले. शिवाय महिन्यासाठी देण्यात आलेले टार्गेट त्यांनी अवघ्या तीन दिवसांमध्ये पूर्ण केले. आता उर्वरीत शेतकऱ्यांनी करायचे काय? असा सवाल आहे.
धान खरेदीसाठी केंद्र तर सुरु करण्यात आली पण त्यासाठी ना कोणते नियोजन ना व्यवस्थापन. एकरी उत्पादनाच्या दृष्टीने ठरवून दिले तेवढचे धान खरेदी करावे असा नियम आहे. पण केंद्र चालकांनी आपले उद्दिष्ट साधण्यासाठी कोणत्याच नियमांची अंमलबजावणी केली नाही. केंद्रा जवळच्या शेतकऱ्यांचे धान खरेदी करुन घेतले. दिलेल्या टार्गेटशी मेळ घालून खरेदी केंद्र बंदही केले आहेत. त्यामुळे उर्वरीत शेतकऱ्यांनी करावे काय असा सवाल आहे. यावर कुणाचाच अंकूश नसल्याने अवघ्या तीन दिवसांमध्ये केंद्र ही बंद झाली आहेत.
यंदा उन्हाळी हंगामातील पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाली. असे असतानाही शेतकऱ्यांना चिंता आहे ती विक्रीची. खुल्या बाजारपेठेत मनमानी दर आकारले जातात त्यामुळे धान उत्पादकांना खरा आधार आहे तो खरेदी केंद्राचा असे असताना यामध्ये दखल घेतली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागलीच धानाची विक्री न करता साठवणूक करुन दरवाढीची प्रतीक्षा करावी असा सल्ला देण्यात आला आहे.