लातूर : ( Kharif season,) खरीप हंगामातील कापूस आणि (tur crop) तूर ही पिके अंतिम टप्प्यात आहेत. यापूर्वी सोयाबीन, उडीद, मूग या पिकांना तर अतिवृष्टीचा फटका बसलेलाच होता. मात्र, ही दोन पिके बहरात होती म्हणून यावर पावसाचा परिणाम झाला नाही. परंतू आता अंतिम टप्प्यात असताना बदलत्या वातावरणामुळे तुरीवर मर तर (outbreak of disease on cotton) कापसावर लाल्याचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. त्यामुळे उत्पादनात तर घट होणारच आहे. पण खरिपातील एकही पिक पूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांच्या पदरी पडेल की नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे अंतिम असलेल्या पिकाचे उत्पादन पदरा पाडून घ्यावयाचे असेल तर योग्य नियोजनच करावे लागणार आहे.
मर रोग हा बुरशीजन्य रोग आहे. यामुळे तुरीच्या खोडावर ठिपके, भेगा पडून झाडाच्या मुळाकडे अन्नद्रव्याचा पुरवठाच होऊ दिला जात नाही. त्यामुळे तुर ही मुळापासूनच वाळायला सुरवात होते. दरवर्षी अंतिम टप्प्यात पिक असताना या मर रोगाचा प्रादुर्भाव हा ठरलेलाच आहे. त्यामुळे वर्षभर केलेली मेहनतही वाया जाते आणि अपेक्षित उत्पादनही मिळत नाही. वातावरणातील बदलाचा हा परिणाम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फुलोऱ्यात असलेल्या तुरीला प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब हे संयुक्त बुरशीनाशक प्रति 1 लिटर पाण्यात 1 ग्रॅम याप्रमाणे मिसळून फवारणे गरजेचे आहे. शिवाय वातावरण स्वच्छ असतानाच याची फवारणी फायदेशीर राहणार आहे.
सध्या तुर ही काढणीच्या अवस्थेत आहे. यापूर्वीच वातावरणातील बदलामुळे पिकांवर परिणाम झालेला आहे. आता ऐन काढणीच्या दरम्यान मुळापासूनच तुरीचे खोड हे वाळू लागले आहे. गतवर्षीही असाच प्रकार झाल्याचे शेतकरी सांगत आहे. त्यामुळे वर्षभर केलेली मेहनत तर वाया जातच आहे पण उत्पादनावर केलेला खर्चही व्यर्थ ठरत आहे. आता काढणीच्या प्रसंगीच ही परस्थिती ओढावल्याने तुरीचा जागेवरच खराटा होत आहे. त्यामुळे खरिपात झालेले नुकसान भरुन कसे काढावे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. काही ठिकाणी कापसाची वेचणी झाली असली तर फरदड अद्यापही वावरातच आहे. अधिकच्या उत्पादनाच्या आशेने शेतकऱ्यांनी फरदड चे उत्पादन घेण्यास सुरवात केली आहे. मात्र, त्यामुळे शेतजमिनीचेही नुकसान होऊ लागले आहे. आता ढगाळ वातावरणामुळे अकोला जिल्ह्यातील कापसाचे फुलपानांची गळती सुरु झाली आहे. शिवाय पाने लाल झाल्याने वाढ खुंटते तर बोंड लागणीचे प्रमाणही कमी होते.
कपाशीवर लाल्या रोगाची लक्षणे दिसू लागल्यास 40 ग्रॅम मॅग्नेशिअम सल्फेट प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन ते तीन फवारण्या कराव्यात किंवा जमिनीतून 20 ते 30 किलो मॅग्नेशिअम सल्फेट प्रति हेक्टरी द्यावे. कपाशीवर मावा तुडतुडे, फुलकिडे यांचा प्रभाव दिसत असेल तर त्यांच्या नियंत्रणासाठी 20 मिली फिप्रोनील, किंवा दहा मिली इमिडाक्लोप्रिड किंवा 20 मिली बुप्रोफेझिन प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.