Pune : सौर ऊर्जेच्या वापरामुळे जिरायती शेती झाली बागायती, आर्थिक खर्चासह श्रमात बचत, लाखोंचं उत्पन्न
सौर पॅनलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे वीज, वादळ, गारा या नैसर्गिक आपत्तीत त्यांचे क्वचितच नुकसान होते. वीज कोसळण्याचा धोका टाळण्यासाठी सौर पंपासोबत वीज संरक्षण यंत्र बसवण्यात आलं आहे.
पुणे – पुण्यातल्या (Pune) भोरमधील (Bhor) खानापूर गावातल्या दशरथ थोपटे यांची शेती सौर ऊर्जेच्या (Solar energy) वापरामुळे जिरायती शेती बागायती झाली आहे. त्यांनी आर्थिक खर्चात आणि श्रमात बचत करून लाखोंच उत्पन्न घेतलं आहे. भारनियमन, शेती पंपाना रात्रीचा उपलब्ध होणारा वीज पुरवठा, वीज बीलातून सुटका व्हावी यासाठी त्यांनी अनोख्या पध्दतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. सौर उर्जेच्या वापरामुळे आपल्याला हवी तशी शेती करता येईल, असं त्यांनी ठरवलं होतं. त्यामुळे शेतकरी दशरथ थोपटे यांनी 16 सोलर पॅनलमधून निर्माण होणाऱ्या 5 के डब्ल्यू वीज निर्मितीतून ही यशस्वी शेती केली.
अनोख्या पध्दतीने शेती करण्याचा निर्णय घेतला
भोर तालुक्यातल्या खानापूर गावातील दशरथ थोपटे या शेतकऱ्याने पारंपरिक भात शेती बाजूला ठेवून अनोख्या पध्दतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. तसेच ती करण्यासाठी काय करावे लागेल याचा विचार देखील केला. सुरूवातीला सौर उर्जा शेतीसाठी वापरण्याचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या असलेल्या शेतीत द्राक्षांसह फळबागेची शेती यशस्वी केली आहे. भाताची शेती म्हणून ख्याती असलेल्या या परिसरात रासायनिक खतांचा अधिक वापर केला जात होता. परंतु थोपटे यांनी औषधांचा कमीत कमी वापर त्याचबरोबर सेंद्रिय, जिवाणू खताचा जास्तीत जास्त वापर करून नैसर्गिक पध्दतीने शेती केली. सौर ऊर्जेचा वापर करुन पाच एकर जिराईत शेती बागायती त्यांनी करून दाखवली आहे. त्यामुळे परिसरात त्यांची शेतीची अधिक चर्चा आहे. अनेक लोक त्यांची सौर उर्जेची पध्दत पाहायला येतात.
प्रत्येकवर्षी पाण्याचा तुटवडा
सह्यादी डोंगर रांगात वसलेला भोर तालुका त्यातील विसगाव खोरे हा बहुतांशी डोंगराळ भाग आहे. पावसाळ्यात प्रंचड पाऊस पडतो उन्हाळ्यात ओढे नाले ओस पडलेले असतात. पिण्याचे पाणी,जनावरासाठी लागणारे पाणी याचा तुटवडा निर्माण होतो. या भागात पारंपरिक शेतीला फाटा देत सतत होणारे भारनियमन, शेती पंपाना रात्रीचा उपलब्ध होणारा वीज पुरवठा. वीज बील यातून सुटका व्हावी या करता प्रगतिशील शेतकरी दशरथ थोपटे यांनी सौर कृषी पंप योजनेतून 5 एच पी क्षमतेचा मोटरपंप बसविला. 16 सोलर पॅनल मधून 5 के डब्ल्यू पर्यंत वीज निर्मिती होते. मोटार 5 डी सी करन्ट तत्वावर चालते. दिवसभरातील सुर्यप्रकाशावर सेलमधून सौर ऊर्जेचे रुपांतर विद्युत उर्जेत होवून विद्युत पंप सुरु होतो.
कमी देखभाल आणि विद्युत अपघातांची भीती नाही
साधारणता सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत पंप चालतो. पाण्याच्या पंपामधून ठिबकचा वापर करुन दिवसभरात तीन एकर क्षेत्र सिंचनाखाली येते. फळबाग, इतर पिके घेता येतात. सध्या या पंपाच्या पाणी क्षमतेनुसार 2 एकर केळी, 16 आर द्राक्ष, 2 एकर भात, 1 एकर कांदे अशी उन्हाळी पिके घेतली आहेत. तर 1 एकर क्षेत्रामध्ये असणाऱ्या पॉली हाऊसलाही पाणी दिलं जातं. दिवसभर सुरु असलेल्या सौर पंपामुळे या पिकांना पाणी देणे सुलभ झाले आहे. इतर शेतकऱ्यांप्रमाणे रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पिकांना पाणी भरण्याचा त्रास सुध्दा कमी झाला आहे. विजेचा किंवा डिझेलचा वापर नसल्याने वीजबिलांचा किंवा इंधनाचा खर्च नाही, कमी देखभाल आणि विद्युत अपघातांची भीती नाही. हा सौर पंप सुमारे 25 वर्षे सेवा देतो. पंपाच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाच वर्षे सौर कृषिपंप किंवा पॅनलची विनामूल्य दुरुस्ती करण्याची किंवा ते नवीन बदलून दिला जातो.
तरूणांसाठी आदर्श शेती
सौर पॅनलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे वीज, वादळ, गारा या नैसर्गिक आपत्तीत त्यांचे क्वचितच नुकसान होते. वीज कोसळण्याचा धोका टाळण्यासाठी सौर पंपासोबत वीज संरक्षण यंत्र बसवण्यात आलं आहे. शेती करताना येणाऱ्या संकटावर मात करून आधुनिक शेती करणारे भोर तालुक्यातील दशरथ थोपटे हे शेतकरी, इतर शेती करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आदर्श ठरत आहेत.