“राजा, कष्टाने माणूस मरत नाही”,कृषीरत्न पुरस्कारानिमित्त राजेंद्र पवारांची भावनिक पोस्ट
राजेंद्र पवार यांनी सविस्तर फेसबुक पोस्ट लिहून कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी ते कुठे होते, याविषयी माहिती दिली. Rajendra Pawar Facebook post

मुंबई: शेती क्षेत्रातील सर्वोच्च असा डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार 2019 साठी बारामती तालुक्यातील पिंपळी येथील राजेंद्र दिनकरराव पवार यांना जाहीर झाला. महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी ही घोषणा 1 एप्रिल रोजी करण्यात आली होती. राजेंद्र पवार पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी नेमकं काय करत होते? सविस्तर फेसबुक पोस्ट लिहून राजेंद्र पवार यांनी पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी ते कुठे होते. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पहिला सत्कार कुठे झाला याविषयी माहिती दिली आहे. (Rajendra Pawar wrote Facebook post for Agriculture Award from Maharashtra Government)
राजेंद्र पवार यांची फेसबुक पोस्ट
खरे तर ही पोस्ट महिनाभरापूर्वीच लिहिली होती परंतु फेसबुकच्या तांत्रिक अडचणींमुळे पाठवता आली नव्हती,ती आज आपणासाठी पोस्ट करत आहे.आपणा सर्वांच्या शुभेच्छांसाठी मन:पूर्वक धन्यवाद..!!
शेतकरी मोठा झाला तर दुकानदार व्यवसायिक मोठे होतात व त्यासाठी काय करता येईल हे दाखवण्यासाठी काही शेतकरी, कृषी विक्री दुकानदार यांना घेऊन काह्राटी, जळगाव सुपे येथील जिरायत शेतीतील 2022 साली कांदा पीक सुधारण्यासाठी तयार केलेले प्लॉट दाखविण्यास घेऊन गेलो असता मला महाराष्ट्र राज्याचा कृषीक्षेत्रातील सर्वोच्च डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाल्याचे समजले व पहिला सत्कार या गावातील शेतकऱ्यांनी केला.
मनात आले या पुरस्कारापर्यंत पोहोचण्यात माझे कार्य काय? 1964-65 साली आजोबांबरोबर बैलगाडीतून फिरताना त्यांनी मला उसाला तुरे का येतात? मोसंबी झाडे का मरतात? तहान लागली की केळफुलाच्या पाकळीने पाणी वेळेला कसे प्यायचे हे बाळकडू दिले. 1969-70 साली वडील नोकरी करत असताना ज्वारीची खळी महिनो-न-महिने माळशिरसच्या शेतात चालत, आई धान्याची रास दाखवे, त्यामागचे कष्ट सांगे, झाडांप्रती प्रेम तिने शिकवले. नोकरी सोडल्यावर वडील अप्पासाहेब यांचा शेती व शेतकऱ्यांचा ध्यास पाहिला, पहिल्या HF गाई, दूध क्रांतीची सुरुवात, इस्राईलचे ड्रिप, अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंटची डेव्हलपमेंट, शेतकऱ्यांसाठी घसा ताणून महाराष्ट्र पालथा घातलेला पाहिला,कदाचित त्या संस्कारातच या पुरस्काराची बिजे असतील.
1978 ते 82 पर्यंत अमेरिकेतील विद्यापीठ व शेतीत काम करून मिळालेला अनुभव, परतल्यानंतर त्याचा इतरांना उपयोग, आलेली दृष्टी व माधवराव काकांनी जाताना दिलेला कानमंत्र “राजा कष्टाने माणूस मरत नाही” या अमृतवाणीचे तर हे श्रेय नाही ना? 2000 साली स्व.आप्पासाहेबांनंतर संस्थेची जबाबदारी माझ्यावर विश्वासाने टाकणारे शरदकाका. माणसाला स्वतःला सिद्ध करायला संधी लागते, ती त्यांनी दिली म्हणून संस्था पुढे नेता आली आणि त्यातून या पुरस्काराची दालने खुली झाली.
कोठेही शिलेदाराचे नाव मोठे होते
पण या नावासाठी, संस्थेसाठी असंख्य हात काम करत असतात ते कोठेच दिसत नाहीत. या पुरस्कारासाठी मला माहीत नसताना माझ्यावरती प्रेमभाव असणारे नलवडे, भोईटे, सदैव कामात तत्पर असणारा ओंकार, अभिजित, सर्व घटक व संस्थेचे विश्वस्त यांनी संस्था मोठी केली, या पुरस्काराचे सर्व सोपस्कार केले व या सर्वांमुळे आज इथपर्यंत पोहोचलो.
नाव घेणे प्रोटोकॉल मध्ये बसणार नाही तरीही कृषी विभाग संस्थेचे व माझे काम सतत पाहत असल्यामुळे त्यांना कामाची वेगळी पावती लागली नसावी. राज्याचे कृषीमंत्री स्वतः जाणकार शेतकरी आहेत, पुरस्कार निवड समितीतील उच्च, कनिष्ठ व स्थानिक अधिकारी यांना या कामाची जाणीव असावी त्यामुळे हा पुरस्कार मिळालेला असावा.
शेवटी नांगराच्या तासामागे श्रद्धेने, निष्ठेने हजारो मैल चालणारा शेतकरी व मी निष्ठेने वेगळा नाही. त्याच निष्ठेप्रती सरकारने व्यक्त केलेला गौरव म्हणजे हा पुरस्कार असावा. कृषीक्षेत्रासाठी 1930 ते 60 च्या काळात कृषितला ऋषी असलेले डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने हा पुरस्कार असल्याने इथून पुढे त्या नावाला शोभणारे कार्य करावे लागेल हे मात्र नक्की.. राजेंद्र पवार
राजेंद्र पवार यांची फेसबुक पोस्ट
कृषीरत्न पुरस्कार जाहीर झालेले राजेंद्र पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे वडील आहेतय
संबंधित बातम्या: