Vegetable : टोमॅटो ‘लालेलाल’, दराच्या तुलनेत पेट्रोलशी स्पर्धा, शेतकरी मात्र त्रस्तच
पालेभाज्याची आवक घटली की मागणी वाढते आणि त्याचा परिणाम थेट दरावर होतो. तेच यावेळी टोमॅटोच्या बाबतीत झाले आहे. दरवर्षी होणारे नुकसान पाहता लागवड क्षेत्रात मोठी घट झाली. शिवाय वातावरणातील बदलामुळे आहे ते उत्पादनही शेतकऱ्यांच्या पदरी पडले नाही. त्यामुळे मागणीच्या तुलनेत बाजारपेठेत कायम टोमॅटोची आवक ही कमीच राहिलेली आहे.
मुंबई : टोमॅटोचे देखील कांद्याप्रमाणेच आहे. घसरत्या दरामुळे त्याचा कधी लाल चिखल होतो तर उत्पादनात घट झाल्यावर (Tomato Rate) टोमॅटो असा काय भाव खातो की त्याची तुलना थेट दिवसाकाठी दरात वाढ होत असलेल्या (Petrol Rate) पेट्रोलशीच केली जाऊ लागते. सध्या वाढत्या दरामुळे टोमॅटो लालेलाल झाला आहे. 10 दिवसांपूर्वी 30 ते 40 रुपये किलोवर असलेला टोमॅटोने आता शंभरी पार केली आहे. त्यामुळे रोजच्या आहारात टोमॅटोचा वापर करावा की नाही इथपर्यंत विषय पोहचलेला आहे. गतवर्षी घसरत्या दरामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो तोडणीचेही कष्ट घेतले नव्हते तर यंदा (Mumbai Market) बाजारपेठेतच नाही तर शेतामध्येही टोमॅटो पाहवयास मिळत नाही अशी स्थिती आहे. उत्पादनात घट आणि वाढलेली मागणी यामुळे दरात विक्रमी वाढ झाली आहे. पण याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना नसून व्यापाऱ्यांना होत आहे.
15 दिवसांमध्ये दरात तिपटीने वाढ
पालेभाज्याची आवक घटली की मागणी वाढते आणि त्याचा परिणाम थेट दरावर होतो. तेच यावेळी टोमॅटोच्या बाबतीत झाले आहे. दरवर्षी होणारे नुकसान पाहता लागवड क्षेत्रात मोठी घट झाली. शिवाय वातावरणातील बदलामुळे आहे ते उत्पादनही शेतकऱ्यांच्या पदरी पडले नाही. त्यामुळे मागणीच्या तुलनेत बाजारपेठेत कायम टोमॅटोची आवक ही कमीच राहिलेली आहे. वाढती मागणी घटलेला पुरवठा यामुळे मुख्य बाजारपेठांमध्ये दरामध्ये तिपटीने वाढ झाली आहे. 10 दिवसांपूर्वी टोमॅटो 30 रुपये किलो होता तर आता 110 रुपये किलो.
शेतकऱ्यांचा माल, व्यापाऱ्यांचा फायदा
भाजीपालाच नव्हे तर इतर शेतीमालाच्या दरात वाढ झाली तरी थेट शेतकऱ्यांनाच याचा फायदा होईल असे नाही. कारण ग्राहक आणि शेतकऱी यांच्यातील मध्यस्तीची भूमिका निभवणाऱ्या व्यापाऱ्यांचाच अधिकचा फायदा होत आहे. कमी आवक असल्याने बाजारपेठेत टोमॅटोचा कृत्रिम तुटवडा तर मागणी नसल्याचे सांगत शेतकऱ्यांकडून कवडीमोल दरात खरेदी केली जाते. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे सध्या दरवाढीचा गाजावाजा होत असला तरी खरी मिळगत ही व्यापाऱ्यांचीच आहे शेतकऱ्यांची नाही.
आवकवर दराचे भवितव्य अवलंबून
सध्या राज्यभरातील मुख्य बाजारपेठेत टोमॅटोची आवक मागणीपेक्षा कमी होत आहे. शिवाय यावरच टोमॅटोच्या दराचे भवितव्य अवलंबून आहे. आता उत्पादन घटले असले तरी भविष्यात आवक वाढली तरच दरात घसरण होईल असा अंदाज व्यापारी राहुल मुंढे यांनी व्यक्त केला आहे. वातावरणातील बदलाचा फटका आता उत्पादनावर झाल्यावर दर वाढतील असाच व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.