Pune : अतिवृष्टीने खरडून गेलेला शिवार पुन्हा बहरणार, सरकारला जमले नाही ते प्रतिष्ठानने करुन दाखवलं!
गतवर्षी पिकांबरोबर शेतजमिनीवरील मातीही वाहून गेली होती. एवढेच नाही तर बांधबंदिस्तीही राहिली नसल्याने शेतकऱ्यांना सर्वकाही नव्यानेच करावे लागणार होते. आता ध्रुव प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतामध्ये माती टाकून बांधबंदिस्ती करुन दिली जाणार आहे. हे काम जेसीबीच्या माध्यमातून 20 दिवसांमध्ये पूर्ण केले जाणार आहे.
पुणे : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने केवळ (Crop Damage) पिकांचेच नुकसान झाले नव्हते तर शेतजमिनीही खरडून गेल्या होत्या. त्यामुळे शेती करायची कशी असा सवाल जिल्ह्यातील भोर तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर होता. (Agricultural Land) शेती क्षेत्रावरील काळी मातीच पावसाच्या पाण्यात वाहून गेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही पिक घेता आले नाही. शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन भोर येथील ध्रुव प्रतिष्ठान अनोखा उपक्रमच हाती घेतला आहे. शेतजमिनीचे नुकसान झालेल्या 15 ते 20 शेतकऱ्यांची जमिन दुरुस्ती करुन दिली जात आहे. प्रत्येक शेतकऱ्याचे 1 हेक्टरपर्यंत क्षेत्र दुरुस्त केले जात आहे. त्यामुळे यंदाच्या (Kharif Season) खरिपात या भागातील शेतकऱ्यांना चाढ्यावर मूठ ठेवता येणार आहे. शासनाकडून केवळ पंचनामे झाले मात्र, वर्ष उलटले तरी दुरुस्ती कामे झाली नसल्याने शेती करावी कशी असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण ध्रुव प्रतिष्ठाणच्या दूरदृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेत यंदाच्या हंगामात बहरणार आहे.
दुर्गम भागातील शेतकऱ्यांना मदतीचा हात
गतवर्षी अतिवृष्टीमुळे शेत जमिनीही ह्या खरडून गेल्या होत्या. यानंतर प्रशासकीय अधिकारी आणि राजकिय नेत्यांकडून पाहणी आणि मदतीच्या घोषणा झाल्या प्रत्यक्ष दुरुस्तीची कामे झालीच नाही. त्यामुळे रब्बी हंगाम तर गेलाच पण उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचा असणारा खरीपही हातचा जाणार ही भीती शेतकऱ्यांमध्ये होती. खरिपातील पेरणीसाठी वाढलेला खर्च आणि त्यात ही दुरुस्तीचे काम शेतकऱ्यांना शक्य नाही. मात्र, भोर येथील ध्रुव प्रतिष्ठानच्या भूमिकेमुळे या दुर्गम भागातील शेतकऱ्यांना मदत मिळत आहे. शेतीच्या आणि बांधाच्या दुरुस्तीचे काम होत आहे. खरीप पेरणीच्या आगोदर शेतकऱ्यांना हे शेत दुरुस्त करुन दिले जाणार आहे.
कसे असणार आहे दुरुस्तीचे काम?
गतवर्षी पिकांबरोबर शेतजमिनीवरील मातीही वाहून गेली होती. एवढेच नाही तर बांधबंदिस्तीही राहिली नसल्याने शेतकऱ्यांना सर्वकाही नव्यानेच करावे लागणार होते. आता ध्रुव प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतामध्ये माती टाकून बांधबंदिस्ती करुन दिली जाणार आहे. हे काम जेसीबीच्या माध्यमातून 20 दिवसांमध्ये पूर्ण केले जाणार आहे. जेणेकरुन खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
अतिवृष्टी दरम्यान झाला होता घोषणांचा पाऊस
अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेले नुकसान पाहण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय मंडळीची रीघ लागली होती. ज्याप्रमाणे पिकांचे नुकसान झाले आहे त्याही पेक्षा शेत जमिनी खरडून गेल्याने आगोदर शेतजमिनी दुरुस्त करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. आता वर्ष पूर्ण होत आहे. खरिपाच्या पेरणीची लगबग सुरु झाली आहे असे असताना दुरुस्ती तर नाहीच पण कसला दिलासाही सरकारने शेतकऱ्यांना दिलेला नाही. ध्रुव प्रतिष्ठानच्या या मदतीमुळे या भागातील शेतकरी सुखावला आहे.