Kharif Season : राज्यात 15 लाख हेक्टरावर पेरण्या, कृषी आयुक्तांनी सांगितले खरिपाचे भवितव्य..!
खरीप हंगामाचे भवितव्य हे पावसावरच अवलंबून आहे. असे असताना जून महिन्यात 207 मिमी पावसाची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात 85. 6 मिमी पाऊस झाला आहे. केवळ 41 टक्के पाऊस झाल्याने त्याचा सर्वाधिक परिणाम हा पेरणीवर होत असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. आतापर्यंत सर्वात कमी पाऊस हा पुणे विभागात 26 टक्के एवढा झाला तर लातूर, औरंगाबाद विभागात 65 टक्केपर्यंत पाऊस झाला आहे
पुणे : (Maharashtra) राज्यात समाधानकारक पाऊस नसताना देखील तब्बल 15 लाख हेक्टरावर खरीप पेरण्या झाल्या आहेत. मान्सून दाखल होऊन महिना होत आहे. असे असताना देखील सरासरीच्या तुलनेत केवळ 33 टक्के ते ही भरवश्याचे नाही अशा सध्या (Kharif Season) खरिपाची अवस्था झाली आहे. राज्यात पेरण्यांचा टक्का घसरला असला तरी पावसाचा अंदाज घेऊनच शेतकरी पेरणीचा निर्णय घेत असल्याने दुबारचे संकट नसल्याचे (Agricultural Department) कृषी विभागाकडून स्पष्ट केले आहे. शिवाय आगामी 15 दिवसांमध्ये पेरणी क्षेत्रात वाढ होईल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्र, कोकण या विभागात अधिकच्या क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, धान, कडधान्य ही मुख्य पीके आहेत.
आतापर्यंत निम्म्यापेक्षाही कमी पाऊस
खरीप हंगामाचे भवितव्य हे पावसावरच अवलंबून आहे. असे असताना जून महिन्यात 207 मिमी पावसाची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात 85. 6 मिमी पाऊस झाला आहे. केवळ 41 टक्के पाऊस झाल्याने त्याचा सर्वाधिक परिणाम हा पेरणीवर होत असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. आतापर्यंत सर्वात कमी पाऊस हा पुणे विभागात 26 टक्के एवढा झाला तर लातूर, औरंगाबाद विभागात 65 टक्केपर्यंत पाऊस झाला आहे. या आठवड्यापासून राज्यात पाऊस सक्रीय झाला असून 15 जुलैपर्यंत चित्र वेगळे असेल असा कृषी विभागाचा अंदाज आहे.
शेतकऱ्यांचा सोयाबीन, कापसाचा भर
75 मिलिमिटरपेक्षा अधिक पाऊस झाला की पेरणीला सुरवात करावी असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई केलेली नाही. मात्र, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा भर हा सोयाबीन आणि कापसावर आहे. नांदेड जिल्ह्यात धूळपेरणी झालेल्या भागामध्ये कापसाची उगवण झाली आहे. राज्यातील पीक पेऱ्याचा अंदाज हा कृषी विभागाकडून घेतला जात असून सुरवात खराब असली तरी हंगाम बहरेल असा विश्वास आहे.
चिंता सोडा, कामाला लागा
पावसाने हुलकावणी दिली असली तरी त्याचा खरिपाच्या उत्पादनावर परिणाम होणार नाही. गेल्या चार ते पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवलेली आहे. सध्या पेरणी कामाला वेग येत आहे तर राज्यात अजूनही कुठे दुबार पेरणीचे संकट ओढावलेले नाही. त्यामुळे उशीर झाला तरी अपुऱ्या पावसावर पेरणीचे धाडस शेतकऱ्यांनी करु नये असे आवाहन कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.