Agriculture News : सोयाबीनचे पुन्हा भाव घसरले, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली, मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती
कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी नव्याने दाखल होत असलेल्या लाल कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) सहा हजार रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीनचे (Soybean) भाव पाच हजारांवर आले आहेत. त्यामुळे बाजारात सोयाबीनची आवक पूर्णपणे मंदावली. भाव वाढण्याच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी घरात सोयाबीन साठवून ठेवलेलं आहे. पण जागतिक बाजारातील स्थिती पाहता सोयाबीनचे दर घसरतच चालले आहेत. तर दुसरीकडे यंदा उन्हाळी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाल्याने भाव वाढण्याच्या शक्यता मावळल्या आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना (Agriculture News) मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे.
कांद्याच्या दरात घसरण
कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी नव्याने दाखल होत असलेल्या लाल कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 1653 वाहनातून 30 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक विक्रीसाठी दाखल झाली होती. या कांद्याला जास्तीत जास्त 1612 रुपये, कमीतकमी 500 रुपये तर सरासरी 1300 रुपये प्रतिक्विंटल ला बाजार भाव मिळाला. दररोज कांद्याच्या बाजार भावात घसरण होत असल्याने 1 हजार रुपयांच्या आत कांद्याचे बाजार भाव येण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने जास्तीतजास्त कांद्याची देशासह विदेशात निर्यात करण्यासाठी केंद्र सरकाराने लक्ष घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.