कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक का?
सद्यस्थितीत तीव्र उन्हाळा असल्याने शेतीसाठी पाणी अन् पंपासाठी वीजही अत्यावश्यक आहे. परंतु महावितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे तालुक्यातील बागायतदार शेतकर्यांचे कंबरडे मोडले.
सांगली : वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार सुरू आहे. काही शेतकऱ्यांना चुकीची बील देण्यात आली. त्यामुळे शेतकरी संतापले. काही जणांचे वीजबिल थकीत आहेत. त्यांची वीज कापण्याचं काम कार्यकारी अभियंता यांच्या वतीने करण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून थकीत असलेल्या वीजबिलाचे कारण देत वीज कापण्याचे काम सुरू आहे. यामुळे शेतकरी संतप्त झालेत. सध्या पिकांना पाण्याची गरज आहे. पीक झाले नाही तर शेतकऱ्यांना काय मिळणार अशी परिस्थिती आहे. त्यामुळे वीज कनेक्शन ताबडतोब जोडण्यात यावेत, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली पाहायला मिळाली. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी नेहमी वाचा फोडत असते. विधिमंडळाच्या अधिवेशनातही कांद्याच्या भावावरून रणकंदन माजलं आहे. इकडं वीज कनेक्शन कापू नये म्हणून शेतकरी आक्रमक झाले आहेत.
वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शेतकर्यांच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आली. याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्यांनी कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. शेतकर्यांना आलेली चुकीची बिले दुरुस्त करून तात्काळ कनेक्शन जोडावीत. आगामी काळात कुणाचेही वीज कनेक्शन तोडू नये अन्यथा विभागीय कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला. मागील पंधरा दिवसांपासून महावितरण कंपनीने तालुक्यातील कृषीपंपाची थकबाकी असलेली वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केली आहे.
चुकीची बिलं दिल्याने शेतकरी संतप्त
सद्यस्थितीत तीव्र उन्हाळा असल्याने शेतीसाठी पाणी अन् पंपासाठी वीजही अत्यावश्यक आहे. परंतु महावितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे तालुक्यातील बागायतदार शेतकर्यांचे कंबरडे मोडले. याबाबत राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन केले होते. वीज तोडणीस महावितरण कंपनी महसूल विभाग नोटीस अन्वये कृषी वीजपुरवठा खंडित न करण्याबाबत परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार वीज कनेक्शन तोडणार नाही अशी ग्वाही दिली होती. परंतु त्यानंतरही दोन-तीन दिवसांतच तालुक्यातील बर्याच शेतकर्यांचे कनेक्शन्स तोडले. चुकीची बिले दिल्याने शेतकर्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.