Latur Market : सोयाबीनची घसरण सुरुच, तुरीला मात्र हमीभावापेक्षा अधिकचा दर, कशामुळे बदलले बाजारपेठेतले चित्र?
सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना देखील दरात सुधारणा नाहीतर उलट दर घसरु लागले आहेत. केंद्राने खाद्यतेलावरील आयात सेवा शुल्कात घट केली आहे. खाद्यतेलाचे दर नियंत्रणात यावे म्हणून केंद्राने हा निर्णय घेतला होता. शिवाय आता दरही घटले आहेत. असे असताना दुसरीकडे आयात शुल्क सेवा ही कमीच ठेवण्यात आली आहे.
लातूर : एकीकडे यंदाच्या (Kharif Season) खरीप हंगामात सोयाबीनच्या क्षेत्रात विक्रमी वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे तर दुसरीकडे बाजारपेठेत (Soybean Rate) सोयाबीनचे दर दिवसेंदिवस घटत आहेत. यंदा उशिरा खरिपातील पेरण्या झाल्याने शेतकऱ्यांनी उडीद, मुगाला डावलून सोयाबीनवर भर दिला आहे. असे असताना दर झपाट्याने घटत असतील सोयाबीनला भविष्य काय राहणार असा सवाल उपस्थित होत आहे. दुसरीकडे हंगामाच्या सुरवातीपासून तुरीला कधी 6 हजार 300 पेक्षा अधिकचा दर नव्हता पण आता तुरीच्या दरात वाढ होऊन तूर 6 हजार 700 रुपये क्विंटलवर स्थिरावली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील (Agricultural prices) शेतीमालाच्या दरात झपाट्याने बदल होत आहेत. हरभरा खरेदी केंद्र बंद झाल्याने त्यालाही उठाव राहिलेला नाही. खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याला 4 हजार 500 असा दर आहे. तर खरेदी केंद्रावर 5 हजार 230 रुपये दर होता.
सोयाबीनच्या दरात कशामुळे घसरण?
सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना देखील दरात सुधारणा नाहीतर उलट दर घसरु लागले आहेत. केंद्राने खाद्यतेलावरील आयात सेवा शुल्कात घट केली आहे. खाद्यतेलाचे दर नियंत्रणात यावे म्हणून केंद्राने हा निर्णय घेतला होता. शिवाय आता दरही घटले आहेत. असे असताना दुसरीकडे आयात शुल्क सेवा ही कमीच ठेवण्यात आली आहे. त्याचा परिणाम सोयाबीनवर होत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात 500 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आता तरी केंद्र सरकराने आयात शुल्क सेवा वाढवण्याची मागणी सोयाबीन प्रोसेसर युनियनने केंद्राकडे केली आहे.
तुरीच्या दरात प्रथमच वाढ
गतवर्षीच्या खरिपातील तूर आणि सोयाबीनची सध्या बाजारपेठेत आवक होत आहे. असे असले तरी तुरीच्या दरात मात्र मोठी वाढ झाली आहे. 6 हजार रुपये क्विंटलवर असलेले दर आता 6 हजार 700 वर येऊन ठेपले आहेत. तर नाफेडने सुरु केलेल्या खरेदी केंद्रावर तुरीला 6 हजार 300 असा दर होता. खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर तुरीच्या दरात घसरण होईल असा अंदाज होता पण उलट तुरीच्या दरात वाढ होत आहे. सोयाबीनपेक्षा तुरीला अधिकचा दर मिळत आहे.
असे आहेत मुख्य पिकांचे दर
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरिपाची लगबग आणि लागून राहिलेला पाऊस यामुळे आवक कमी आहे. असे असले तरी सोयाबीन, तूर आणि हरभऱ्याची आवक होत आहे. शेतकऱ्यांना खरिपासाठी पैशाची गरज आहे. त्यामुळे शेतकरी साठवलेला माल विक्री करीत आहे. सध्या मुख्य पीक असलेल्या सोयाबीनला प्रति क्विंटल 6 हजार 100 रुपये असा सरासरी दर आहे. तर तुरीच्या दरात वाढ झाली असून 6 हजार 700 रुपये प्रति क्विंटल दर आहे. रब्बी हंगामातील हरभऱ्याच्या दरात काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. हरभऱ्याला 4 हजार 600 असा दर मिळत आहे.