जळगाव : शेतीमालावर झालेला खर्च, (Climate Change) वाातावरणातील बदल आणि पदरी पडलेल्या मालाचे काय मुल्य असावे याबाबत आता स्थानिक पातळीवरच निर्णय होऊ लागले आहेत. उत्पादनावर झालेला खर्च आणि त्या तुलनेत किती नफा असावा हे धोरण ठरवून दर निश्चित केले जात आहेत. यापूर्वी नाशिक, सोलापूर आणि सांगली येथे द्राक्षाचे दर निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार काही भागांमध्ये विक्रीही सुरु आहे. आता अशाच प्रकारचा निर्णय खानदेशात (Papaya Production) पपई उत्पादक, बाजार समिती आणि खरेदीदारांनी घेतला आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे निर्णय घेण्याचे ठरले होते पण एकमत न झाल्याने हा निर्णय रखडला होता. आता पपई काढणी सुरु झाल्याने हा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ असल्याने प्रति किलो (Papaya Rate) 8 रुपये दरनिश्चित करण्यात आला आहे. एकमुखाने हा निर्णय झाला असला तरी प्रत्यक्षात खरेदी-विक्री होताना त्याची अंमलबजावणी होणेही गरजेचे आहे. अन्यथा यामध्ये फूट पडली तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याबाबत शहादा बाजार समितीमध्ये निर्णय झाला आहे. सध्या हंगाम जोमात सुरु असून या निर्णयाचा शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना फायदा होणार आहे.
यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले होते. सर्वाधिक फटका फळबागायत शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता. त्यामुळे खानदेशातील अनेक शेतकऱ्यांनी पपई बागाची मोडणी करुन इतर पिकांचा पर्याय निवडला. तर काहींनी तळहाताच्या फोडाप्रमाणे बागा जोपासल्या. आता प्रत्यक्ष विक्रीची वेळ आली असताना व्यापाऱ्यांकडून कवडीमोल दराने मागणी होत आहे. त्यामुळे उत्पादनावर झालेला खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडत नसल्याने हा दर निश्चित केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
पपई उत्पादनात मोठी घट झाल्याने आहे त्या शेतीमालाला चांगला दर मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यानुसारत शाहदा बाजार समितीमध्ये झालेल्या बैठकीत हा दर ठरवून घेण्यात आला आहे. असे असले तरी खानदेशात सध्या सरासरी 16 टन पपईची आवक होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातून अधिकची आवक असून त्यानंतर धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावातील चोपडा, यावल, जामनेर, मुक्ताईनगर येथून आवक सुरु आहे. वाढत्या उष्णतेमध्ये स्थानिक बाजार पेठेत मागणी नसली तरी राजस्थानमधून मागणी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे जे नुकसान निसर्गामुळे झाले आहे त्याची तर भरपाई व्हावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करी आहेत.
जानेवारीमध्ये द्राक्ष काढणीला वेग येताच नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादक संघानेही महिन्यानुसार द्राक्षाचे दर निश्चित केले होते. पण काळाच्या ओघात व्यापाऱ्यांनी याला विरोध केला. निर्यातीसाठी ठरलेला दर परवडत नसल्याचे सांगून नियमाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे आता खानदेशात पपईचे ठरलेले दर आणि त्यासंबंधीची नियमावलीची अंमलबजावणी होते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
देर आए… दुरुस्त आए..: ज्वारी पिकाला मिळणार गतवैभव, स्थानिक पातळीवर काय होणार प्रयत्न ? वाचा सविस्तर
FRP : ज्याची धास्ती शेतकऱ्यांना ‘तोच’ निर्णय राज्य सरकारचा, ‘एफआरपी’ बाबत नेमके काय झाले?