द्राक्ष पंढरी हळहळली! बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास डोळ्या देखत निघून गेला…
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. हाता तोंडाशी आलेल्या पिकाचा घास अवकाळी पावसाने हिरावून नेल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे.
नाशिक : नाशिक जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री अवकाळी पाऊस (Unseasonal rain) कोसळला आहे. अवकाळी पाऊसाने रब्बीच्या पिकाचे मोठे नुकसान केले आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष ( Grapes ) बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागेचे मोठे नुकसान होत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. अवकाळी पावसाने नाशिक जिल्हा पूर्ण झोडपून काढला आहे. यामध्ये द्राक्ष बागेबरोबरच कांदा, गहू यांसह हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. खरंतर काढणीला आलेले पीक एका रात्रीत नाहीसे झाल्याने शेतकरी राजा उद्ध्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.
ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस आल्याने शेतकऱ्याचे झालेले नुकसान शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकणारे आहे. खरं तर यंदाची वर्षी अतिवृष्टीमुळे पावसाळी पिकांनी पदरी निराशाच टाकली आहे. त्यानंतर रब्बी पीक तरी बळीराजाला सावरेल अशी परिस्थिती होती. मात्र त्यातची अवकाळी पाऊस आला आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
खरंतर नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांदा ही प्रमुख पिके आहेत. त्याबरोबर गहू आणि हरभरा देखील हे पीक घेतले जाते. मात्र, सध्या सोमवारी मध्यरात्री आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान शेतकऱ्यांना मोठा धक्का देणारे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आले आहे.
शेतकऱ्यांचे रब्बीचे पीकही हातातून गेल्याने महाराष्ट्र शासनाने त्वरित पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे. खरंतर पावसाळी पिकेही शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकणारी ठरली होती. मुसळधार पावसानं शेत माल शेतातच सडून गेला होता. आताही पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुके हे अवकाळी पावसाने झोडपून निघाले आहे. त्यामध्ये रब्बीचे सर्वच पिके धोक्यात आली आहे. अगदी हाता तोंडाशी आलेला घासच शेतकऱ्यांचा गेल्याने मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे पुन्हा आलेले हे आसमानी संकट बळीराजाला उद्ध्वस्त करत आहे.
नाशिकच्या सिन्नर, निफाड या तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा पीक आणि द्राक्षाचे नुकसान झाले आहे. द्राक्ष मनी गळून खाली पडू लागले आहे. काही मन्यांना रात्रीतून काजळी येऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हे नुकसान शासनाने भरून काढावे अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी करू लागले आहे.
सध्या परिसरात पूर्ण ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामध्ये द्राक्ष बागा अधिकच अडचणीत सापडणार आहे. याशिवाय कांदा पिकावरही रोगराई पसरणार आहे. त्यामुळे कांदा पीक शेतातच सडून जाणार आहे. ऐन सणसुदीच्या दरम्यान शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून बळीराजा मेटाकुटीला आला आहे.