Agricultural Pump : चोरटेही शेतकऱ्यांच्या मुळावर, रात्रीतून 10 कृषिपंप लंपास
यंदा उन्हाळी हंगामातही जलस्त्रोतांचे पाणी हे टिकून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांचा प्रयोग केला आहे. उत्पादनवाढीसाठी हंगामी पिकांवर शेतकऱ्यांचा भर राहिला असून आता कडाक्याच्या उन्हामध्ये पाणी हे गरजेचेच आहे.
पुणे : नैसर्गिक संकटाचा सामना करीत शेतकरी उत्पन्न वाढीचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच (Summer Crop) उन्हाळ्यातही हंगामी पिकांचे उत्पादन घेण्यावर भर देण्यात आला असताना (Pune District) शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांना वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळी हंगामातील पिके पाण्याला आली असतानाच आमदाबाद गावातील तब्बल 10 (Agricultural Pump) कृषिपंप हे चोरीला गेले आहेत. त्यामुळे ही कसली दुश्मनी असा सवाल उपस्थित झाला असून पिकेही पाण्याविना करपून जात आहेत. त्यामुळे कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकट हे शेतकऱ्यांवर कायम राहिले असून त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. ऐन उन्हाच्या तडाख्यात कृषिपंपाची चोरी झाल्याने शेतीमालाला पाणी द्यायचं कसं याच्याच चिंतेने शेतकरी हतबल झाले आहेत.
पाणी असूनही उपयोग नाही, डोळ्यादेखत पिकांची राख
यंदा उन्हाळी हंगामातही जलस्त्रोतांचे पाणी हे टिकून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांचा प्रयोग केला आहे. उत्पादनवाढीसाठी हंगामी पिकांवर शेतकऱ्यांचा भर राहिला असून आता कडाक्याच्या उन्हामध्ये पाणी हे गरजेचेच आहे. असे असताना विहिरींवरील कृषीपंपच गायब झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आतापर्यंत सुरळीत विद्युत पुरवठा होत नसल्याने पिके धोक्यात होती आणि पाणी आहे, विद्युत पुरवठाही सुरळीत होत आहे असे असतानाही शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
शेतकऱ्यांची पोलिसांत धाव
एकाच रात्रीचत 10 कृषिपंपाची चोरी झाल्याने गावातील इतर शेतकऱ्यांचाही झोप उडाली आहे. शिवाय चोरट्यांना जेरबंद करावे व भविष्यात अशा घटनांना आळा बसवण्य़ासाठी पोलीस प्रशासनाने यंत्रणा राबवण्याची मागणी शेतकऱ्यांनी पुणे ग्रामीण पोलिसांकडे केली आहे. सध्याच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये कृषी विकत आणायचे तरी कसे असा सवाल उपस्थित होत आहे. आता कुठे नैसर्गिक संकटाने पाठ सोडली तर शेतकऱ्यांसमोर नवेच संकट उभे राहिले आहे.
शेतकऱ्यांकडून रात्रीचा पहारा
चोरट्यांनी थेट कृषीपंपावरच डल्ला मारण्याचा धडाका सुरु केल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. कृषीपंपाची चोरी होऊ नये म्हणून शेतकरी शेतामध्ये रात्र जागून काढू लागले आहेत. दिवसभऱ शेतीचे काम आणि रात्री पंपाचे संरक्षण. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद करुन शेतकऱ्यांच्या मनातील भीती दूर करण्याची मागणी आहे. पाण्याअभावी उन्हाळी पिकांचे मात्र नुकसान सुरु आहे.