कापसाला भाव नाही विक्री कशी करायची?; कापूस घरी ठेवला तर या आजाराचा धोका
हे फायबर व्यक्तीच्या संपर्कात आले तर त्वचेवर परिणाम होतो. तसेच दम्यासारखे आजार उद्भवतात. घरात जास्त दिवस कापूस असेल तर त्वचारोग किंवा दम्याचे आजार होण्याची शक्यता जास्त असते.
बुलढाणा : जास्त दिवसापासून कापूस घरात असल्याने शेतकऱ्यांना त्वचारोग होत आहेत. कापसाचे भाव वाढतील या आशेने बहुतांश शेतकऱ्यांनी अजूनही आपला संपूर्ण कापूस विकलेला नाही. अनेक दिवसांपासून कापूस घरात ठेवून असल्याने आता या कापसावर डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळेच त्वचारोगासारख्या समस्या जाणवू लागल्या आहेत. खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथील सुरेश बोहरपी यांच्या घरात अनेक दिवसापासून कापूस घरी ठेवला. त्या कापसावर डासाची उत्पत्ती होऊन त्याच्यापासून आता त्वचारोग जडले आहेत. त्यामुळे त्वचारोगासह दमा सारखे आजार टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कापूस जास्त दिवस न ठेवता त्याची विक्री करावी. किंवा कापूस झाकून ठेवावा असे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.
डॉक्टर म्हणतात, अशी घ्या काळजी
सुरेश बोहरपी या शेतकऱ्याने कापसाची दोन एकर जागेत शेती केली. कापूस अजून विकला नाही. घरी ठेवला आहे. कपाशीत जंतू झाले. त्यामुळे घरात झोपणे मुश्कील झाले आहे. डासांची उत्पत्ती झाली आहे. याबाबत डॉ. दीपक लद्दड म्हणाले, कापूस हे ऑरगॅनिक मटेरीअल आहे. त्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारचा कीटक तयार होऊ शकतो. अशा कीटकांचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. कापसात फायबर असतात. हे फायबर व्यक्तीच्या संपर्कात आले तर त्वचेवर परिणाम होतो. तसेच दम्यासारखे आजार उद्भवतात. घरात जास्त दिवस कापूस असेल तर त्वचारोग किंवा दम्याचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. कापसाच्या ढिगाला व्यवस्थित झाकून ठेवावे. जेणेकरून व्यक्तीच्या श्वसनमार्गात ते फायबर येऊ नयेत. फायबर तसेच कीटक व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचं डॉ. दीपक लद्दड यांनी सांगितलं.
भाव नसल्याने घरातच साठवणूक
दुसरीकडं, शेतकऱ्यांच्या पांढरं सोनं नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहे. कापसाला भाव नसला तरी देखील शेतकरी आता विक्रीसाठी कापूस नंदुरबार बाजार समितीत विक्रीसाठी दाखल होत आहे. मागील वर्षाचे तुलना यावर्षी कापसाची आवक वाढली आहे. आतापर्यंत ७० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. कापसाला सुरुवातीला सोन्यासारखा भाव मिळाला होता. मात्र कापसाची आवक वाढल्याने दरात घसरण झाली होती. सध्या स्थितीत कापसाला ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० पर्यंतच्या भाव मिळत आहे. मध्यंतरी कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवणूक करून ठेवला होता. त्यामुळे आता हंगाम शेवटच्या टप्प्यात असल्याने कापूस विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर दाखल होणार आहे. असे बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी सांगितले.