हरभरा पिकाला ‘हे’ पीक ठरत आहे पर्याय, उत्तर भारतातसह विदर्भातही लागवड, कमी खर्चात जास्त उत्पन्न
अत्यंत सोप्या पद्धतीने हरभऱ्याप्रमाणेच या राजमा पिकाची लागवड करावी लागते. शिवाय कुठल्याही रोगराईची या पिकाला भीती नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी प्रचंड प्रमाणात विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात राजमा पिकाची लागवड होण्याची शक्यता आहे.
गणेश सोळंकी, बुलढाणा : कधी असमानी तर कधी सुलतानी संकटांनी विदर्भातील शेतकरी (vidharbha farmer) पुरता नडला जातोय. सातत्याने विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या (farmer suicide) झाल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याची पाहायला मिळते. एकीकडे प्रचंड उत्पादन खर्च आणि दुसरीकडे उत्पादित शेतमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. भयान वास्तव बुलढाणा (buldhana) जिल्ह्यात पाहायला मिळतंय, राजमा पिकाची लागवड करत हरभरा पिकाला बुलढाण्यातील प्रयोगशील शेतकऱ्याने पर्याय म्हणून आपल्या शेतात लागवड केली आहे. त्यातून या शेतकऱ्याला अत्यंत कमी खर्चात आणि कमी वेळेत लाखो रुपयांचा फायदा होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याच्या केळवदचे प्रयोगशील शेतकरी संतोष गायकवाड यांनी पारंपरिक पद्धतीने यंदा रब्बी हंगामात हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली. मात्र या हरभऱ्यावर मुळकुंज या रोगाने हरभऱ्याचे पीक फस्त केले. त्यामुळे उत्तर भारतात प्रामुख्याने घेतलं जाणार राजमाचं पीक बीड, सातारा, सांगली सारख्या पश्चिम महाराष्ट्रात घेतलं जातं. त्या पाठोपाठ आता विदर्भात देखील या प्रयोगशील शेतकऱ्याने हरभऱ्याला पर्याय म्हणून आपल्या शेतात राजमाची लागवड केली आहे.
पाण्याची उपलब्धता चांगली असेल तर साधारणपणे अडीच महिन्याचे हे पीक आहे. या शेतकऱ्याला आपल्या पाच एकरामध्ये या राजमाची लागवड करताना प्रति एकर 6000 रुपये प्रमाणे एकूण 30 हजार रुपये उत्पादन खर्च आला आहे. एकरी आठ क्विंटल एवढी झडती या शेतकऱ्याच्या शेतात राजमा पिकाला लागल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे. एका एकरात आठ क्विंटल राजमा तर पाच एकरात तब्बल 40 क्विंटल राजमा पिकाचं उत्पादन या प्रयोगशील शेतकऱ्याला होणार आहे. किरकोळ बाजारात याच राजमाला तब्बल 110 रुपये प्रति किलोचा भाव आहे. मात्र ठोक बाजारात जरी हा राजमा विकला तर शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल आठ हजार रुपयाचा दर मिळतो. त्यामुळे चाळीस क्विंटल ला 8000 रुपयांचा चा जर का हिशोब धरला तरी या शेतकऱ्याला केवळ अडीच महिन्यात तीन लाख वीस हजार रुपयांच उत्पन्न होतंय. त्यातून उत्पादन खर्च 30000 रुपये वजा केल्यास तब्बल अडीच महिन्यात हा शेतकरी दोन लाख 90 हजार रुपयांचा धनी होतोय. ज्यातून अगदी सहजपणे हा शेतकरी आपली आर्थिक सुबत्ता साधू पाहतोय अशी प्रतिक्रिया शेतकरी संतोष गायकवाड यांनी दिली.
अत्यंत सोप्या पद्धतीने हरभऱ्याप्रमाणेच या राजमा पिकाची लागवड करावी लागते. शिवाय कुठल्याही रोगराईची या पिकाला भीती नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी प्रचंड प्रमाणात विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात राजमा पिकाची लागवड होण्याची शक्यता आहे. त्यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो अशी प्रतिक्रिया विजय बित्तेवार, कृषी अधिकारी बुलढाणा यांनी दिली.
रब्बीचा हंगाम म्हटला तर गहू, कांदा आणि हरभरा हे पारंपरिक पीके आलीच. पश्चिम विदर्भात शेतकरी नित्यनेमाने हरभऱ्याचे, गव्हाचं त्याचबरोबर कांद्याची लागवड करतो. मात्र रोगराईमुळे कांदा आणि हरभऱ्यालाही शेतकऱ्याला पाहिजे तसा दर मिळत नाही. गव्हाची परिस्थिती काही वेगळी नाही. मात्र केळवदच्या या प्रयोगशील शेतकऱ्याने उत्तर भारतातील राजमाच पीक आपल्या शेतात घेऊन पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना एक नवा संदेश दिला आहे.