Lasalgaon : वीज टंचाईचा ‘असा’ हा परिणाम, किसान रेलसह मालगाड्यांनाही लागले ‘ब्रेक’
13 एप्रिलपासून किसान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत प्रशासनाने अचानक निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे. अन्यथा हंगाम सुरु झाल्यापासून भाजीपाला, फळपिके यांची निर्यात इतर बाजारपेठेत होत असल्याने चांगला दर मिळत होता. आता शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेचाच आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे दरावरही त्याचा परिणाम झाला आहे.
लासलगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्यात (Power Shortage) वीज टंचाईचा प्रश्न गाजत आहे. मात्र, याचे आता इतर परिणामही दिसून येऊ लागले आहेत. कारण वीज टंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रचंड प्रमाणात कोळसा वाहतूक सुरु झाली आहे. या कोळसा वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी (Kisan Railway) किसान रेल आणि मालगाड्या 13 एप्रिल पासून काही कालावधीसाठी अचानक बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या (Agricultural Commodities) शेतीमालाच्या वाहतूकीची गैरसोय झाली आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या अर्थकारणावरही त्याचा परिणाम होणार आहे. रेल्वे विभागाने घेतलेल्या अचानक निर्णयाचा परिणाम होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तर दुसरीकडे किसान रेल अधिकचा वेळ एकाच थांबल्यास शेतीमालाचे नुकसान होत असल्याने हा निर्णय घेतल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगतिले जात आहे.
30 एप्रिलपर्यंत बंदच राहणार किसान रेल
13 एप्रिलपासून किसान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत प्रशासनाने अचानक निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे. अन्यथा हंगाम सुरु झाल्यापासून भाजीपाला, फळपिके यांची निर्यात इतर बाजारपेठेत होत असल्याने चांगला दर मिळत होता. आता शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेचाच आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे दरावरही त्याचा परिणाम झाला आहे. मिळेल त्या किंमतीमध्ये शेतीमाल विकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. 31 एप्रिलपर्यंत ही सेवा बंद राहणार आहे. त्यानंतर मात्र, शेतीमालाची वाहतूक सुरळीत होईल असे सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट अन् खर्चात वाढ
इंधनाच्या दरात दररोज वाढ होत असल्याने मालट्रकच्या भाड्यात ही वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल परराज्यात पाठवण्यासाठी प्रचंड अडचणीचा सामना करण्याची वेळी आली आहे. तसेच आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाकडे तसेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनाही निवेदन देत किसान रेल आणि मालगाड्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे किसान रेल्वेबाबत लवकर निर्णय झाला तर शेतकऱ्यांना त्याचा अधिकचा फायदा होणार आहे.
रेल्वे प्रशासनाचेही नुकसान
किसान रेल्वे बंद असल्यामुळे केवळ शेतकऱ्यांचेच नुकसान झाले असे नाही तर रेल्वे प्रशासनाला आर्थिक झळ बसलेली आहे. नासिक रोड ते दानापुर पर्यंत आठवड्यातून 4 दिवस किसान रेलच्या माध्यमातून 40 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. गेल्या पंधरा दिवसांपासून किसान रेल्वे बंद असल्याने 8 किसान रेल न गेल्यामुळे 80 लाख रुपयांच्या उत्पन्नावर रेल्वेला पाणी सोडावे लागले आहे. मालगाडीच्या माध्यमातून परराज्यात कांदा पाठवला जातो. वाढलेल्या इंधनाच्या दरामुळे मालट्रकच्या भाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. परराज्यात कांदा कसा पाठवावा असा प्रश्न व्यापाऱ्या्ंसमोर उभा राहिला आहे. दररोज एक मालगाडीतून लासलगावसह नाशिक जिल्ह्यातून कांदा परराज्यात पाठवला जातो. यातून रेल्वेला दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते पण याला मुकावे लागले आहे.