गहू आणि हरभऱ्याचं उत्पादन घटण्याची शक्यता, शेतकऱ्याला नफा की तोटा होणार?
गहू आणि हरभरा या पिकासाठी थंडी महत्वाची असते. थंडी या दोन्ही पिकासाठी पोषक असते. ढगाळ हवामानामुळे थंडीही कमी झाली असून पिकांवर रोगराई आली असून औषध फवारणी करावी लागत आहे.
नाशिक : महाराष्ट्रात प्रयोगशील शेतकरी (Farmer News) म्हणून नाशिक जिल्हयातील (Nashik News) शेतकऱ्यांना ओळखलं जातं. त्याचे कारण म्हणजे शेतीत वेगवेगळे प्रयोग करून उच्च प्रतीचे उत्पादन आणि जिल्ह्यात असणारे पोषक वातावरण. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात भाजीपाला असो नाहीतर कांदा, गहू आणि इतर रब्बीचे पिकं (Rabi crop) ही चांगल्या दर्जाची असतात. त्यामध्ये कांदा आणि द्राक्ष या पिकाबरोबर गहू आणि हरभरा पिकाचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन असते. यंदाच्या वर्षी मात्र शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता अधिक आहे. यंदाच्या हंगामात रब्बीची महत्वाची पीके असलेली गहू आणि हरभरा ही पीकं शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच देणार आहे.
अधूनमधून येणाऱ्या ढगाळ वातावरणाचा फटका यंदाच्या वर्षी गहू आणि हरभरा या पिकाला बसणार आहे. थंडीच्या दिवसांत घेतली जाणारी गहू आणि हरभरा ही पिकं संकटात सापडली आहे.
गहू आणि हरभरा या पिकासाठी थंडी महत्वाची असते. थंडी या दोन्ही पिकासाठी पोषक असते. ढगाळ हवामानामुळे थंडीही कमी झाली असून पिकांवर रोगराई आली असून औषध फवारणी करावी लागत आहे.
रब्बीच्या हंगामात यंदाच्या वर्षी वातावरणाच्या बदलामुळे कांदा पीकांवर करपा आणि फुलकिड, हरभरा पिकावर घाटे अळी आणि गव्हावर तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे औषध फवारणीचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
त्यातच पीकं आता अंतिम टप्प्यात आलेली असतांना त्यांना सूर्यप्रकाशाची गरज आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे पिकांना सूर्यप्रकाश मिळत नाहीये, त्यामुळे तो देखील एक फटका बसत आहे.
गेल्या काही वर्षांपासून जमिनीतील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे रब्बीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, ते यंदाच्या वर्षी विविध कारणामुळे घटणार आहे.
एकूणच शेतकऱ्यांना यंदाच्या वर्षीची परिस्थिती पाहता आर्थिक फटका बसणार आहे. उत्पादन घेण्यासाठीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी गहू आणि हरभरा यांच्या किंमती वाढणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
याशिवाय रब्बीच्या काळातच द्राक्ष, कांदा या पिकांना देखील फटका बसत आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर या पिकांवर औषध फवारणी करण्याच्या अधिकचा खर्च करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या मका, सोयाबीन, टोमॅटो, कांदे या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे रब्बीचं पीक तरी आधार देईल अशी शक्यता असतांना ढगाळ वातावरणाचे नवं संकट उभे राहिले आहे.