अवकाळी पावसाने पुन्हा झोडपले, पीकांचे नुकसान, राज्यात पावसाची शक्यता
काल सायंकाळी सांगली जिल्ह्यात सर्वत्र कमी अधिक पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काही ठिकाणी द्राक्ष बागा शिल्लक आहेत. तेथे जास्त नुकसान झाले आहे.
महाराष्ट्र : नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) धुमाकूळ घातला असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे (Farmer) नुकसान होताना दिसून येत आहे. नागपुरात (Nagpur) काल दुपारपासून सुरू झालेला पाऊस सुरूच असून उन्हाळ्यामध्ये पावसाचा वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळते. आज सकाळपासूनच पावसाळी वातावरण निर्माण झालं असून सगळ्यांची तारांबळ उडाली आहे. हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून तर नुकसानदायक आहेच आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हा नुकसानदायक ठरताना दिसतो. सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने अनेकांनी पावसाची शक्यता व्यक्त केली होती. महाराष्ट्रात आज सुध्दा अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
द्राक्ष बागांचं पुन्हा नुकसान
काल सायंकाळी सांगली जिल्ह्यात सर्वत्र कमी अधिक पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काही ठिकाणी द्राक्ष बागा शिल्लक आहेत. तेथे जास्त नुकसान झाले आहे. शिवाय रॅकवर बेदाणा बनवण्यासाठी टाकलेल्या द्राक्षाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच भागात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह उन्हाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. चार दिवसांपासून या भागात वातावरणात बदल झाला होता. काल सकाळपासून ढगाळ वातावरण व उकाडा वाढला असताना सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली.
यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यातील नेर, बाभूळगाव, महागाव, आर्णी तालुक्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. नेरमध्ये काही भागात गारा आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे आंबा आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. जवळ पास दीड तास झालेल्या या पावसाने व्यापाऱ्यांची धावपळ झाली. तर मिलमिली नदीला पूर आला. त्यामुळे अवकाळी पावसाने भर उन्हाळ्यात पावसाळा अनुभवण्याची वेळ नागरिकांवर आली. या पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक झाडे कोलमडून पडली
बुलढाणा जिल्ह्यात काल सकाळपासून विविध ठिकाणी विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे खामगाव तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडले आहेत. त्याचबरोबर मका, कांदा आणि फळबाग पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचे तार तुटल्याने विद्युत पुरवठा देखील खंडित झालेला आहे. तर चीतोडा येथील एका शेतकऱ्याचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला आहे. घराची भिंत पडल्याने दोन वर्षाच्या चिमुकलीचा देखील मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.