Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, पावसाळा आहे की उन्हाळा…
परभणी शहरात दुपारी दोनच्या सुमारास जोरदार पावसासह काही प्रमाणावर गारपीट झाली. आठवडाभर परभणी जिल्ह्यात अनेक भागात गारपीट आणि पावसाचा जोर सुरूच आहे.
अमरावती : अमरावती (Amravati) जिल्ह्यात मध्यरात्री अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) तुफान बॅटिंग केली. या पावसामुळे मात्र अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उघड्यावर असलेले धान्य पुन्हा एकदा पावसात भिजले. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना धान्य ठेवण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे वारंवार पावसामुळे उघड्यावर असलेले धान्य पावसात भिजते, तर यावेळी सकाळीच आमदार रवी राणा (Ravi rana) यांनी बाजार समितीत जाऊन पाहणी केली. दरम्यान यावेळी रवी रणा सह शेतकरी नेते प्रकाश साबळे यांनी बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी शेडची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.
शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
परभणी शहरात दुपारी दोनच्या सुमारास जोरदार पावसासह काही प्रमाणावर गारपीट झाली. आठवडाभर परभणी जिल्ह्यात अनेक भागात गारपीट आणि पावसाचा जोर सुरूच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे उन्हाळा की पावसाळा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसान हजेरी लावली. काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून सुटका मिळाली आहे. ढगाळ वातावरण कायम असल्यानं पुन्हा पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादन शेतकरी संकटात
अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. तर त्यात अकोला जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं आहे. तर मागील मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झाल आहे. गारपीटीमुळे जिल्ह्यातील पातुर आणि बार्शीटाकळी तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झाल आहे. तर काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे बार्शीटाकळी तालुक्यातील वाघझळी गावातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. तर संतोष चिंचोळकर आणि मारुती व्यवहारे या शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. या पावसामुळे काढणीला आलेला कांदा वाहून गेला आहे. तर काढलेला कांदा म्हणजेच कांद्याचे ढिगारे पाण्याखाली गेल्यानं पूर्ण कांदा नष्ट झाला आहे. तर आता झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी, अशी अपेक्षाही शेतकरी व्यक्त करत आहे.