वेळेत पंचनामे नाहीत, तर शेतकऱ्यांना वेळेत मदत कशी मिळणार, शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळं अब्दुल सत्तारांचा अधिकाऱ्यांना आदेश
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांसोबतच भाजीपाल्याचे देखील मोठे नुकसान झालं आहे.
जितेंद्र बैसाणे, नंदूरबार : जिल्ह्यात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. पिकांचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिलेले असतानाही नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात अद्याप पंचनाम्यांचे काम पूर्ण झालेले नाही. पंचनाम्यांचा एकत्रित अहवाल आज पूर्ण होणार असल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र आजही पंचनामे पूर्ण होणार का याची शाश्वती विभागाकडून देण्यात आलेले नाही आहे. वेळेवर पंचनामे होणार नाही तर शेतकऱ्यांना वेळेवर मदत कशी मिळणार असा प्रश्न आता बळीराजा विचारू लागला आहे. जिल्ह्यात जवळपास 11 हजार शेतकऱ्यांचं यात नुकसान झालं आहे. तर पाच हजारपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्र नुकसानीच्या अंदाज महसूल विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी लवकर पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवावा अशी विनंती आता शेतकरी करू लागला आहे. शासनापुढे लवकर अहवाल गेल्याने लवकर बळीराजाला मदत मिळेल अशीच अपेक्षा होत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांसोबतच भाजीपाल्याचे देखील मोठे नुकसान झालं आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे आवक मंदावली असल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सर्व सामान्य नागरिकांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. अवकाळी पावसामुळे वांगे, बटाटे, मेथी, कांद्याची पात, टमाटे, भांडी, हिरवी मिरची, अशा अनेक भाजीपाल्यांचं नुकसान झालं आहे. येणाऱ्या काळात भाजीपाल्याची आवक आणखीन कमी होणार असल्याने भाजीपाल्याचे दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्व सामान्य नागरिकांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील साही कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र नंदुरबार आणि तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगली चुरस पाहायला मिळत आहे. नंदुरबार आणि तळोदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि माजी आमदार शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक मानली जात आहे. या बाजार समितीमुळे पुढील येणाऱ्या निवडणुकीचे गणित ठरणार आहेत. त्यामुळे नंदुरबार आणि तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे संपूर्ण जिल्ह्याच्या लक्ष लागून आहे.