अवकाळी पावसाने राज्याला झोडपले, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात झालाय पाऊस
भंडारा जिल्ह्यात आठवड्याभरापासून सतत येत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे धान्य पिकांसह बागायती शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर अक्षरशः वांगी शेतातच फेकून देण्याची पाळी आलेली आहे.
पालघर : पालघर (Palghar) जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू असून याचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर झाल्याचा पाहायला मिळला आहे. डहाणूपर्यंत धावणाऱ्या लोकल सध्या दहा ते पंधरा मिनिट उशिराने धावत होत्या. डहाणूकडे येणाऱ्या अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील लोकल सध्या दहा ते पंधरा मिनिटे उशिरा धावत आहेत. राज्यात (maharashtra) अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार (unseasonal rain) पाऊस झाला आहे.
मागील दोन दिवस आलेल्या चक्रीवादळीय पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर, जळका जगताप, नया सावंगा, गौरखेडा, अमदोरी यासह इतर अनेक गावात थैमान घातले असुन अनेक गावातील घराची पत्रे उडाले आहेत. घरातील कापूस, गहू, सोयाबीन, तूर व अन्नधान्यांचे मोठे नुकसान झाले. आमदार प्रताप अडसड यांनी नुकसानीची पाहणी केली व अधिकार्यांना तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
भंडारा जिल्ह्यात आठवड्याभरापासून सतत येत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे धान्य पिकांसह बागायती शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर अक्षरशः वांगी शेतातच फेकून देण्याची पाळी आलेली आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी शासनाने त्वरीत नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात सोनाळा शिवारात सुमारे साडेपाचशे मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. यामुळे मेंढपाळ व्यावसायिकांचे सुमारे एक कोटी रुपयांचा नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून नांदगाव तालुक्यातील मेंढपाळ जामनेर तालुक्यात मेंढ्या चराईसाठी आलेले होते. काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्याच्या पावसासह जोरदार गारपिटीमुळे एकापाठोपाठ एक अशा शेकडो मेंढ्यांचा मृत्यू झालाय. यामुळे मेंढपाळ कुटुंबियांनी एकच टाहो फोडला होता. आज दुपारी महसूल विभागाचे अधिकारी यांच्यामार्फत घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.