मुंबई : उत्पादन वाढीसाठी कितीही नियोजन केले तरी अनियमित पावसामुळे शेतकरी अयशस्वी ठरत आहे. गेल्या तीन वर्षात केवळ (Untimely rains) अवकाळी पावसामुळे तब्बल 26 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. गतवर्षीही ऐन डिसेंबर महिन्यातच पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे दोन्ही हंगामातील तसेच ( damage to agricultural crops) फळबागांचेही नुकसान झाले होते. पीक नुकसानीचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या जीवनमानावरही होणार आहे. कारण येत्या काळात निसर्गाच्या या लहरीपणामुळे महागाईत देखील वाढ होणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. विशेष म्हणजे असा अवकाळी पाऊस हा वर्षभर कायम राहणार असल्याने पिके जोपासायची कशी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. निसर्गाच्या लहरीपणाचे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर राहणार आहे. तर याच्या व्यवस्थापनेसाठी अधिकच्या खर्चाचा भारही सहन करावा लागणार आहे.
यंदाच नाही तर गेल्या तीन वर्षापासून अवकाळीचा फटका बहरात आलेल्या फळबागांना बसत आहे. यंदा तर फळबागासह खरिपातील पिकांचेही नुकसान झाले होते. तीन वर्षात राज्यातील कोल्हापूर, चाळीसगाव, सांगली, पुणे, नाशिक तसेच कोकणातील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या दोन वर्षात तौक्ते चक्रीवादाळामुळे कोकणातील काजू, आंबा, नारळाच्या बागा ह्या उध्वस्त झाल्या होत्या. तर रब्बीतील ज्वारी, बाजरी, व कडधान्यांनाही याचा फटका बसला होता.
वृक्षतोडीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तापमान वाढीवर त्याचा परिणाम झाला आहे. 0.5 अंश सेल्सिअस असलेले तापमान हे 0.8 अंशावर गेलेले आहे. त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे सातत्याने निर्माण होत असल्याने अवकाळी पावसामध्ये सातत्य राहत आहे. यंदा तर दर 15 दिवसांनी अवकाळी पाऊस होणार असल्याचे हवामान शास्त्रज्ञ डॅा. रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे.
अवकाळी पाऊस हा नुकसानीचा ठरत आहे. यापूर्वी प्रदीर्घ पावसाने उघडीप दिली तर अवकाळीचा आधार रहायचा आता मात्र, हाच अवकाळीचा पाऊस नुकसानीचा ठरत आहे. यंदाच्या अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान हे आंबा आणि द्राक्ष बागांचे झाले आहे. दोन्हीही पिके अंतिम टप्प्यात असतानाच पाऊस व वातावरणातील बदलामुळे आंब्याचा मोहोर गळाला आहे तर द्राक्षाचे मणीगळ होऊन न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. केवळ अंतिम टप्प्यात असलेल्या पिकांना नाही तर नुकतीच पेरणी झालेल्या रब्बी हंगामातील पिकांचेही या पावसामुळे नुकसान झाले आहे. ज्वारी पिकावर शक्यतो किडीचा प्रादुर्भाव नसतो पण यंदा उगवताच किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. घटत्या उत्पादनाचा परिणाम हा थेट महागाईवर होणार असल्याचे संकेत आहेत.