Osmanabad : उसाला भारी टोमॅटो, वर्षात दुहेरी उत्पादनातून शेतकरी करोडपती
एकदा एका पिकातून उत्पादन मिळाले नाहीतर शेतकरी त्याचा नाद सोडून देतात. मात्र, सातत्य ठेवले तर यश हमखास आहे. गेल्या 7 वर्षापासून हा भाजीपाला आणि हंगामी पिकांचा प्रयोग असल्याने यामधील चांगल्या-वाईट बाजू निदर्शनास आल्या आहेत. म्हणूनच सलग दोनवेळा टोमॅटो लागवडीचे धाडस केले आणि यामधून कोट्यावधींचे उत्पादन पदरी पडल्याचे सुभाष माकोडे यांनी सांगितले आहे.
उस्मानाबाद : ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक असले तरी (Vegetable) भाजीपाल्यातून काय चमत्कार होऊ शकते हे (Osmanabad) जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शिराढोणच्या शेतकऱ्याने दाखवून दिलंय. (Tomato Crop) टोमॅटोलाच मुख्य पीकाचा दर्जा देऊन वर्षभरात एकदा नाहीतर दोन वेळेस लागवड करुन त्यांनी ही किमया साधली आहे. पारंपरिक शेतीला त्यांनी कधीच फाटा दिलाय तर बाजारपेठेचा अभ्यास करुन शेतीचे नियोजन हा त्यांच्या यशामागचे गमक आहे. निसर्गाचा लहरीपणा जणू त्यांच्यासाठी एक संधी घेऊन आला होता. बदलत्या परस्थितीमुळेच हे धाडस करणाऱ्या सुभाष आणि शरद माकोडे या बंधूची ही यशोगाथा आहे. हो वर्षभरात दोन वेळा 12 एकरामध्ये त्यांनी टोमॅटोची लागवड केली आणि यामधून चक्क 2 कोटी 50 लाखाचे उत्पन्न घेतले आहे.
मुख्य पिकाला बगल, भाजीपाल्याचीच शेती
वाढीव उत्पादनाचा खरा आधार हे मुख्य पिक असल्याचा गैरसमज या माकोडे बंधूंनी केव्हाच मोडीत काढाला आहे. त्यामुळे गेल्या 7 वर्षापासून त्यांनी हंगामी पिके आणि भाजीपाल्यावर भर दिला आहे. 12 एकरातील शेतीमधून टोमॅटो, कारले, टरबूज यामधूनच ते अधिकचे उत्पादन घेत आहेत. यंदा तर टोमॅटोचे जसे बाजारपेठेत दर वाढत होते त्याच्या कैतपटीने माकोडे यांच्या शेतामधील टोमॅटोचे उत्पादन वाढत होते. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांनी 12 एकरावर टोमॅटोची लागवड केली होती. नोव्हेंबर ते डिसेंबरच्या कालावधीत त्यांना यामधून 1 कोटीचे उत्पन्न मिळाले. तर लागलीच त्यांनी पुन्हा 12 एकरावर टोमॅटोचीच लागवड केली होती. मार्चमध्ये लागवड केलेले टोमॅटोची आता बाजारपेठेत आवक सुरु असून दुसऱ्या प्लॉटमधून त्यांना दीड कोटीचे उत्पादन मिळाले आहे.
बाजारपेठेचा अभ्यास अन् लागवडीचे धाडस
एकदा एका पिकातून उत्पादन मिळाले नाहीतर शेतकरी त्याचा नाद सोडून देतात. मात्र, सातत्य ठेवले तर यश हमखास आहे. गेल्या 7 वर्षापासून हा भाजीपाला आणि हंगामी पिकांचा प्रयोग असल्याने यामधील चांगल्या-वाईट बाजू निदर्शनास आल्या आहेत. म्हणूनच सलग दोनवेळा टोमॅटो लागवडीचे धाडस केले आणि यामधून कोट्यावधींचे उत्पादन पदरी पडल्याचे सुभाष माकोडे यांनी सांगितले आहे. बाजारपेठेचा अंदाज घेऊनच पिकाची निवड केली जाते. त्यामुळे नुकसान तर टळते पण अधिकचे उत्पादनही मिळते.
माकोडे बंधूचा निर्णय इतरांसाठीही प्रेरणादायी
शिराढोण येथील सुभाष माकोडे यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला असला तरी इतर शेतकऱ्यांच्या मात्र जीवनमानातच बदल झालेला आहे. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आता गावातील शेतकरी बाजारपेठेचा अभ्यास करुन भाजीपाल्याची लागवड करीत आहेत. हा बदल हळुहळु होत असला तरी शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरत आहे. शेतीमधून उत्पन्न वाढविता येते त्यासाठी वेगळी वाट आणि सातत्य किती महत्वाचे आहे हेच या यशोगाथेतून समोर येतंय.