वाशिमच्या शेतकऱ्यांनी दाखवलं एकीचं बळ, पुण्यात प्रशिक्षण घेत बांधावर प्रयोगशाळा, जैविक रसायनांची शिवारात निर्मिती
रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे दिवसेंदिवस जमिनीचे बिघडत चाललेले आरोग्य, ही कृषीक्षेत्रासमोरील प्रमुख समस्या ठरली आहे. यावर रामबाण उपाय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी जैविक निविष्ठांची कास धरली आहे.
वाशिम : रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे दिवसेंदिवस जमिनीचे बिघडत चाललेले आरोग्य, ही कृषीक्षेत्रासमोरील प्रमुख समस्या ठरली आहे. यावर रामबाण उपाय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी जैविक निविष्ठांची कास धरली आहे. वाशिम जिल्ह्यातील एरंडा येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेताच्या बांधावरच जैविक प्रयोगशाळा उभारून त्यात शेतीला लागणाऱ्या जैविक साहित्याची निर्मिती सुरू केली आहे.याच जैविक निविष्ठांचा उपयोग शेतीत करण्यात येत असून यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे जमिनीचा पोत ही सुधारला आहे.
जयकिसान शेतकरी गटाची निर्मिती
रासायनिक खते व किटकनाशकांच्या अमर्याद वापरामुळे दिवसेंदिवस शेतीचा पोत बिघडत चालला आहे.रासायनिक निविष्ठांवर होणाऱ्या प्रचंड खर्चामुळे उत्पादन खर्च वाढला असून त्या तुलनेत उत्पन्न मात्र घटत चालले आहे. या समस्येवर वाशीम जिल्ह्यातील एरंडा येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत रामबाण उपाय शोधला आहे. एरंडा गावातील जवळपास 16 शेतकऱ्यांनी एकत्र येत जयकिसान शेतकरी गटाची स्थापना केली आणि फार्म लॅब ची स्थापना केली.
स्लरी,डीकंपोस्टिंग कल्चर,लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया, ट्रायकोडर्मा या जैविक निविष्ठांची निर्मिती
मागील वर्षीच्या कोरोना काळात गावातील 16 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतीच्या बांधावर जैविक प्रयोगशाळा उभारली व याठिकाणी जैविक निविष्ठांचे उत्पादन सुरू केले आहे.आज या प्रयोगशाळेत शेती करीता उपयुक्त असलेल्या विविध प्रकारच्या स्लरी,डीकंपोस्टिंग कल्चर,लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया, ट्रायकोडर्मा या जैविक निविष्ठांची निर्मिती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी प्रयोगशाळा उभारण्यासाठी दीड लाख रुपये खर्च केले आहेत. जवळच्या गावातील शेतकऱ्यांना या प्रयोगशाळेचा फायदा होत आहे, असं प्रयोग शाळा संचालक दीपक घुगे यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांनी जैविक निविष्ठांचा वापर करावा
शेतीच्या बांधावर सुरू करण्यात आलेल्या या प्रयोगशाळे सोबत आज अनेक शेतकरी जोडले जात असून परिसरातील शेकडो एकर शेतीत या जैविक निविष्ठांचा वापर करण्यात येत आहे.यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन कमी होऊन उत्पन्नात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे शेतीचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांनी विद्यापीठांकडून प्रशिक्षण घेऊन निविष्ठांची निर्मिती केल्यास आणि त्याची परिससातील शेतकऱ्यांना विक्री केल्यास त्यांना फायदा होऊ शकतो. यातून शेतकऱ्यांचा निविष्ठांवरचा खर्च वाचू शकतो, असं जिल्हा कृषी अधीक्षक कृषी विभागाच्या वतीनं सागंण्यात आलं आहे.
पुण्यात प्रशिक्षण
प्रयोगशील शेतकरी नीरज पांडे यांनी रासायनिक शेतीतून गेल्या दहा वर्षांमध्ये जैविक शेतीकडे वळलो असल्याचं सांगितलं. आता त्यांनी त्यांच्या एकूण शेतीमध्ये 60 टक्के जैविक खत आणि 40 टक्के रासायनिक खताचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. ट्रायकोडर्माचा वापर केल्यानं शेतीमध्ये त्याचा फायदा दिसून येत असल्याचं नीरज पांडे यांनी सांगितलं आहे. प्रयोगशाळा स्थापन करण्यापूर्वी जयकिसान गटातील 16 शेतकऱ्यांनी पुण्याला जाऊन प्रशिक्षण घेतलं.
संबंधित बातम्या:
Konkan Rain | राजापुरात रस्त्यावर बोटी उतरवण्याची वेळ, रत्नागिरी, सिंधुदुर्गात धुवाँधार पाऊस
Washim Farmers starting Jay Kisan Farmers Group in Eranda Village and Set up Organic Lab in farm