वर्धा : सध्या राज्यात पावसाची हजेरी नसली तरी (Kharif Season) खरिपाची लगबग सुरुच आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी (Agricultural Department) कृषी विभाग तर राबत आहेच शिवाय ज्यांनी शेती क्षेत्रात अनोखे प्रयोग केले आहेत त्यांचे मार्गदर्शनही महत्वाचे ठरत आहे. त्यापैकीच बिजमाता पद्मश्री (Rahibai Popare) राहिबाई पोपरे यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरणार आहे. यंदा बी-बियाणांच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक भार वाढलेला आहे. त्यामुळेच वर्धा येथील दत्ता मेघे फाऊंडेशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मोफत बी-बियाणांचे वाटप झाले आहे. या दरम्यान, पद्मश्री राहिबाई पोपरे यांना शेतकऱ्यांना दिलेला संदेश उत्पादनवाढीसाठी लाखमोलाचा ठरणार आहे. त्यामुळे कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि कृषी क्षेत्रात ज्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले त्यांचे सल्ले शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे.
भरघोस उत्पन्न घेण्याची आज प्रत्येकाची इच्छा आहे. पण, त्याकरिता कराव्या लागणाऱ्या परीश्रमाला कोणी तयार नाही. शेतकऱ्यांनी स्वतःच्या शरीरासारखीच आपल्या जमिनीची काळजी घेतल्यास तिची पोत सुधारेल. काळ्याआईची आपण जेवढी काळजी घेऊ तेवढेच उत्पन्न वाढणार आहे. शेती हा बांधावरुन करण्याचा विषय राहिलेला नाही. ज्याचे हात राबतात त्याला यश आहेच. त्यामुळे निसर्गाचा लहरीपणा समजून आणि बाजारपेठेचा अभ्यास करुन त्याला परिश्रमाची जोड दिली तर बळीराजा हा राजाच राहणार असल्याचे राहिबाई पोपरे यांनी सांगितले आहे.
देशाचा पुरस्कार मला मिळाला असला तरी तो काळ्या आईची सेवा केल्यामुळेच. शिवाय अजूनही माझे कार्य हे सुरु असल्याचे सांगत राहिबाई यांनी रासायनिक खताला योग्य पर्याय मिळणेही गरेजेचे असल्याचे सांगितले. काळाच्या ओघात उत्पादनात वाढ झाली असली तरी उत्पादनाची पध्दतीही बदलणे गरजेचे आहे. कारण सध्या शेतकरी हे रासायनिक खताचा मारा करुन उत्पादन वाढवतात पण आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे शेणखत व जैविक खताचा उपयोग करण्याचा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
वाढत्या महागाईमुळे विकतचे बियाणे आणि खते घेऊन ते जमिनीत गाढणे अवघड झाले आहे. शिवाय शेतीमालाचे घसरते दर आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबापुढे पेरणीचे संकट आहे. त्यामुळे काही क्षेत्रावर पेरा होईल का नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे वर्धेत दत्ता मेघे फाऊंडेशन तसेच वर्धा सोशल फोरमच्या संयुक्त विद्यमाने सेलू व वर्धा जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मोफत बी-बीयाणे वाटप करण्यात आले. 56 कुटुंबियांना ही मदत झाली आहे. यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार व जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे होते.