Wheat Price: गव्हाने महागाईलाही रडवले; निर्यातीवर बंदी तरीही गव्हाचे भाव गगनाला
गव्हाच्या भावाने सर्वसामान्य नागरिकांचे पीठ काढले आहेत. पण गव्हाचे भाव इतके का वाढत आहेत? किमान आधारभूत किंमत (MSP) 2015 रुपये प्रतिक्विंटल आहे, परंतु अनेक राज्यांमध्ये या आधारभूत किमतींपेक्षा चढ्या भावाने गव्हाची विक्री सुरू आहे.
गव्हाच्या भावाने सर्वसामान्य नागरिकांचे पीठ काढले आहेत. पण गव्हाचे भाव इतके का वाढत आहेत? किमान आधारभूत किंमत (MSP) 2015 रुपये प्रतिक्विंटल आहे, परंतु अनेक राज्यांमध्ये या आधारभूत किमतींपेक्षा चढ्या भावाने गव्हाची विक्री सुरू आहे. आता, महागाईला आळा घालण्यासाठी सरकारने गव्हाच्या निर्यातीवर (Wheat Export) बंदी घातली आहे. गहू निर्यातीवर बंदी असूनही त्याचे भाव अद्याप कमी होताना दिसत नाहीत. देशातील अनेक मंडयांमध्ये किमान आधारभूत किंमतीपेक्षा (MSP) गहू 400-500 रुपये प्रतिक्विंटल अधिक दराने विकला जात आहे. 15 मे रोजी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील औसा (Ausa) मंडी येथे त्याची कमाल किंमत 2,676 रुपये प्रतिक्विंटल या विक्रमी उच्चांकी पातळीवर (Higher Level) पोहोचली. तर सरासरी 3215 रुपये प्रतिक्विंटल भाव होता. 14 मे रोजी गुजरातमधील बनासकांठा येथील दिसा मंडी येथे कमाल भाव 2905 रुपये होता आणि सरासरी भाव 2,300 रुपये प्रति क्विंटल होता. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात गव्हाचे दर अजूनही एमएसपीपेक्षा जास्त आहेत.
अशा परिस्थितीत केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा यांनी गव्हाच्या उत्पादनाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. आहुजा यांच्या मते, यंदा विशेषत: वायव्य भारतात उष्णतेच्या लाटांचा गहू पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे, परंतु उपलब्धतेतील फरक गेल्या वर्षीच्या तुलनेत किरकोळ आहे. मग प्रश्न उरतो की, असे असतानाही गव्हाचे भाव इतके चढे का आहेत?
काय आहेत कारणे?
ओरिगो ई-मंडीचे वरिष्ठ व्यवस्थापक (Commodity Research ) इंद्रजित पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गव्हाच्या निर्यातीवर सरकारने बंदी घातली असली, तरी देशांतर्गत बाजारात गव्हाची किंमत एमएसपीच्यावर आहे. गव्हाचे उत्पादन सरकारच्या मागील अंदाजापेक्षा कमी असल्याचे समोर येत आहे. तर काही दिवसांपूर्वीपर्यंत निर्यातीच्या उत्तम संधीमुळे व्यापाऱ्यांनी गव्हाचा भरपूर साठा करून ठेवला होता. ज्यामुळे बाजारात गव्हाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळेच देशांतर्गत बाजारात गव्हाचे भाव सतत वाढत आहे.
Video : पाहा महत्त्वाची बातमी
पुरवठ्यातील तुटवड्यामुळे जागतिक बाजारात (Global Market) गव्हाच्या दरात अजूनही जोरदार चुरस असल्याचे इंद्रजित पॉल सांगतात. त्याचबरोबर येत्या काही दिवसांत जिथे देशांतर्गत बाजारात भावात सुधारणा होऊ शकते, तिथे विदेशी बाजार मजबूत राहील. आगामी काळात मंडयांमध्ये शेतकरी, व्यापाऱ्यांकडून पुरवठा वाढणार असून, त्यामुळे भाव 100 ते 150 रुपयांनी कमी होतील.
कोणत्या बाजारात किती आहेत किंमती (मंडी भाव)
- बिहारमधील शेखपुरा येथे 14 मे रोजी गव्हाचा कमाल भाव 2250 सरासरी 2150 रुपये होता, तर किमान भाव 2050 रुपये होता.
- छत्तीसगडच्या दुर्ग मंडीमध्ये गव्हाचा कमाल भाव 2230 रुपये, सरासरी भाव 2225 रुपये आणि किमान भाव 2220 रुपये होता.
- गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील धानेरा मंडीला कमाल 2645 रुपये तर सरासरी 2410 रुपये प्रतिक्विंटल दर होता.
- गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगर मंडईत कमाल भाव 2955 रुपये तर सरासरी दर 2628 रुपये प्रति क्विंटल होता.
- अहमदाबादमध्ये कमाल भाव 2465 रुपये होता तर सरासरी भाव 2440 रुपये प्रति क्विंटल होता
- गुजरातच्या भावनगर मंडईत किमान भाव 2350 रुपये, कमाल 2705 आणि सरासरी भाव 2475 रुपये प्रतिक्विंटल होता.
- महाराष्ट्रातील जालना मंडईत गव्हाचा कमाल भाव 4251 रुपये प्रतिक्विंटल होता.
- राजस्थानच्या बरन मंडीमध्ये किमान भाव 2050, कमाल 2309 तर सरासरी भाव 2200 रुपये प्रति क्विंटल होता.