नांदेड : (Eknath Shinde) शिंदे सरकारची स्थापना होताच शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र, गेल्या महिन्याभरात 89 हून अधिक (Farmer) शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्यात झाल्या आहेत. (Ajit Pawar) विरोधी पक्षनेते अजित पवार हे नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत आहेत. दरम्यान, माहूर येथे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समजताच त्यांनी या घटनेला जबाबदार कोण? मुख्यमंत्री महोदय आता सांगा 302 चा गुन्हा नेमका कुणावर दाखल करावा असा सवाल त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. सध्या जगाचा पोशिंदा अडचणीत आहे. त्याला अडचणीतून बाहेर काढल्याशिवाय आत्महत्या कशा रोखणार असा सवालही पवार यांनी उपस्थित केला आहे.
शेतकरी, कष्टकरी यांच्या समस्या कमी करण्यासाठी योग्य ती धोरणे राबवली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथविधी झाला की केली होती. मात्र, केवळ घोषणा करुन उपयोग नाही तर प्रत्यक्षात योजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. आश्वासनांनी शेतकऱ्यांच्या समस्या मिटणार नाहीत तर त्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर येणे गरजेचे आहे. सगळेच प्रश्न हे मुंबई राहून मार्गी लागणार नसल्याचा सल्लाही अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. अतिवृष्टी होऊन आठवड्यापेक्षा अधिकचा काळ गेला आहे. असे असताना अद्यापही पंचनामे हे झालेले नाहीत. सर्व शेतकऱ्यांचे एकच गऱ्हाणे असून आता मदतीसाठी सरकारने पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.
विदर्भातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार हे आता मराठवाड्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानपाहणीसाठी दाखल झाले आहेत. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पिकाचे नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र अधिक बाधित झाले आहे.असे असले तरी अजूनही पंचनामे झाले नाहीत त्यामुळे मदतीचा तर प्रश्नच उरलेला नाही. हारतुरे आणि सत्कार समारंभात सरकार व्यस्त आहे तर लाखो जनतेचा पोशिंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे त्रस्त आहे. अशा परस्थितीत आर्थिक मदत गरजेची असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, ते नाशिक औरंगाबाद याठिकाणा पदाधिकारी यांच्या भेटी घेणार आहेत. एकीकडे शेतकरी अडचणीत असताना त्याला वाऱ्यावर सोडून हार-तुरे घेण्यात हे सरकार व्यस्त आहे. त्यामुळे शिंदे सरकारला दौरे महत्वाचे आहेत का? शेतकऱ्यांचे दुख: असा सवालही यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. एकंदरीत नुकसानीची पाहणी करीत असताना राज्य सरकारला धारेवर धरण्याची एकही संधी पवार यांनी सोडेलेली नाही.