Onion Rate : भुजबळ मिटवतील का कांदा दराचा वांदा..! मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात दडलयं काय?
महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणावर कांदा पिकविणारे राज्य आहे. भारतातील एकुण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा 33 टक्के वाटा आहे. शिवाय येथील कांद्याची प्रतही चांगली असल्याने निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापुर, सातारा, अहमदनगर, धुळे, बुलढाणा आणि जळगांव हे जिल्हे कांदा उत्पादनासाठी प्रसिध्द असुन महाराष्ट्रातील एकुण कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्याचा 29 टक्के वाटा आहे.
नाशिक : गेल्या 4 ते 5 महिन्यापासून (Onion Rate) कांद्याचे घसरलेले दर अजूनही वधारलेले नाहीत. (Summer Season) उन्हाळी हंगामातून उत्पादन तर सोडाच पण शेतकऱ्यांनी केलेला खर्चही पदरात पडलेला नाही. असे असताना कांदा दरातील घसरण थांबवण्यासाठी आ. छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र व्यवहार केला आहे. शिवाय दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षाने मुख्यमंत्री यांची भेटही घेतली होती त्यादरम्यानही (Chagan Bhujbal) भुजबळ यांनी घटत्या (Onion Rate) कांद्याच्या दराकडे सरकारचे लक्ष वेधून घेतले होते. यानंतर दोन दिवसांनी पुन्हा कांदा दराचा वांदा मिटवावा आणि याकरिता काहीतरी उपाययोजना राबवावी अशा मागणीचे पत्रच त्यांनी लिहले आहे. त्यामुळे कांद्याचे दर सरासरीएवढे आणण्यात छगन भुजबळ आणि राज्य सरकार यशस्वी होणार का हेच पहावे लागणार आहे. सध्या कांद्याला 10 ते 11 रुपये असा दर मिळत आहे.
सर्वाधिक कांदा उत्पादन महाराष्ट्रात
महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणावर कांदा पिकविणारे राज्य आहे. भारतातील एकुण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा 33 टक्के वाटा आहे. शिवाय येथील कांद्याची प्रतही चांगली असल्याने निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापुर, सातारा, अहमदनगर, धुळे, बुलढाणा आणि जळगांव हे जिल्हे कांदा उत्पादनासाठी प्रसिध्द असुन महाराष्ट्रातील एकुण कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्याचा 29 टक्के वाटा आहे. कांदा उत्पादनात महाराष्ट्राचे मोठे योगदान असूनही येथील शेतकऱ्यांना दराच्या बाबतीत योग्य न्याय मिळत नसल्याची खंत भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. सर्वसाधारणपणे हा कांदा नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव, नंदुरबार व औरंगाबाद या सहा जिल्ह्यातून विक्रीस येतो. आलेल्या कांदा आवकेपैकी 70 ते 80 टक्के कांदा हा निर्यातयोग्य असल्याचाही उल्लेख पत्रामध्ये आहे.
म्हणून कांदा दरात घसरण सुरुच
रब्बी हंगामात गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक व पश्चिम बंगाल या राज्यांसह महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापुर या जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने देशांतर्गत कांद्याची मागणी घटलेली आहे. त्यातच बांग्लादेशाने कांदा आयातीवर निर्बंध लादले आहेत व श्रीलंकेत आर्थिक परीस्थिती निर्माण झाल्यामुळे कांद्याची निर्यात ठप्प झालेली आहे. भारताच्या या दोन्ही प्रमुख आयातदार देशांमध्ये भारतीय कांदा निर्यात होत नसल्याने मागणी अभावी कांद्याची बाजारभावात दिवसेंदिवस घसरण होत आहे.
निर्यात प्रोत्साहन योजनेचा होईल फायदा
कांदा निर्यातदारांकरीता केंद्र शासनाने लागू केलेली 10 % कांदा निर्यात प्रोत्साहन योजना गेल्या दोन वर्षापासून बंद आहे.ही योजना पुन्हा सुरु करण्याची मागणी भुजबळांनी पत्रात केली आहे. शिवाय बांग्लादेशला कांदा निर्यात पुर्ववत सुरू होणेसाठी प्रयत्न करून रेल्वेद्वारे कांदा पाठवण्याची तरतूदीची मागणी त्यांनी केली आहे. देशांतर्गत किंवा परदेशात कांदा पाठविणाऱ्या खरेदीदारांना माल वाहतुक दरात अनुदान मिळत असल्याने कांदा खरेदीदार हे निर्यातीचे प्रयत्न करतील असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.