Cotton Crop : काय सांगता..? पावसाचा पत्ता नाही अन् नांदेडात बहरतंय कापसाचं पीक..! शेतकऱ्यांची गडबड कशासाठी
गतवर्षी कापसाचे उत्पादन घटले असले तरी विक्रमी दराने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. कापसाला 14 हजार रुपये क्विंटल असा दरही मिळाला होता. शिवाय अजून कापसाची मागणी ही सुरुच आहे. त्यामुळे वाढीव दराचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या अंतिम टप्प्यात कापसाचा पेरा केला असून आता हे पीक बहरत आहे.
नांदेड : खरिपाची पेरणी ही घाईनेच करावी पण अपेक्षित पाऊस झाल्यावर. मात्र, नांदेड जिल्ह्यात आताच (Cotton Crop) कापूस पीक बहरताना पाहवयास मिळत आहे. (Cotton Sowing) कापसाची पेरणी लवकर होऊन त्यावरील (Outbreak of bondage) बोंडअळीचा प्रादुर्भाव हा इतर पिकांवर होतो म्हणून 1 जून पर्यंत बियाणे विक्रीला बंदी असताना पेरणी झालीच कशी असा सवाल आहे. मात्र, कापसाचे उत्पादन हंगामापूर्वीच पदरी पडून अधिकचा दर घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ही गडबड केली आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्याच शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला आहे. मात्र, आता पाऊस हा लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांचा हा प्रयोग यशस्वी होणार का हे पहावे लागणार आहे. नांदेडच्या माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा वेळेपूर्वीच केला आहे.
विक्रमी दरामुळे कापसाच्या क्षेत्रात वाढ
गतवर्षी कापसाचे उत्पादन घटले असले तरी विक्रमी दराने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. कापसाला 14 हजार रुपये क्विंटल असा दरही मिळाला होता. शिवाय अजून कापसाची मागणी ही सुरुच आहे. त्यामुळे वाढीव दराचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या अंतिम टप्प्यात कापसाचा पेरा केला असून आता हे पीक बहरत आहे. शिवाय यंदा सोयाबीन पाठोपाठ कापसाचे क्षेत्र वाढेल असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. हे चित्र नांदेड जिल्ह्यात असले तरी उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, बीड या जिल्ह्यामध्ये सोयाबीनचेच क्षेत्र वाढणार आहे.
वाढीव दराचा फायदा होण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रयत्न
कापसाचा हंगाम संपला तरी दर हे टिकून आहेत. शिवाय बाजारपेठेत कापसाचा तुटवडा आणि वाढती मागणी यामुळे यंदाही दर सरासरीप्रमाणेच राहतील असा अंदाज आहे. मात्र, हंगामाच्या सुरवातीच्या वाढीव दराचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाचे नियम डावलून कापसाचा पेरा केला आहे. आता वेळेत पावसाने हजेरी लावली तर शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल.
इतर पिकांना कपाशीचा धोका काय ?
सध्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कपाशीचा पेरा केला असला तरी भविष्यात याचे परिणाम पाहवयास मिळणार आहेत. कारण कपाशीवरील बोंडअळीचा परिणाम केवळ कापूस पिकावरच होतो असे नाही तर इतर पिकेही प्रभावित होतात.त्यामुळे सर्वच पिकां बरोबर कपाशीचा पेरा व्हावा ही भूमिका कृषि विभागाने घेतली होती. मात्र, याला डावलून काही शेतकऱ्यांनी पेरा केला असला तरी आगामी काळात होणाऱ्या परिणामांना जबाबदार कोण हा प्रश्नच आहे.