मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघ मुख्यालयात, मोहन भागवत कोंडी फोडणार?
राज्यात तयार झालेला सत्ता स्थापनाचा पेच सुटता सटत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis meet Mohan Bhagwat) अखेर नागपुरात संघ मुख्यालयात पोहचले आहेत.
मुंबई: राज्यात तयार झालेला सत्ता स्थापनाचा पेच सुटता सटत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis meet Mohan Bhagwat) अखेर नागपुरात संघ मुख्यालयात पोहचले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांची (Devendra Fadnavis meet Mohan Bhagwat) भेट घेतली. या बैठकीत राज्याच्या सत्तास्थापनेबाबत काही महत्त्वाचा निर्णय झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत गोपनीयपणे मोहन भागवत यांची भेट घेतली. त्यांच्या दिवसभराच्या कार्यक्रमपत्रिकेत या भेटीचा कोणताही उल्लेख नव्हता. विशेष म्हणजे बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलणे देखील टाळले. बैठकीनंतर ते थेट आपला गाड्यांचा ताफा घेऊन निघून गेले. यानंतर ते मुंबईला जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
आरएसएसच्या शाखेंचं भक्कम पाठबळ नेहमीच भाजपसोबत राहिलं आहे. अनेकदा संघाचे प्रचारक भाजपमध्ये थेट महत्त्वाच्या पदावर आले आहेत. राम माधव हे अलिकडचं महत्त्वाचं नाव. त्यामुळे भाजपच्या निर्णय प्रक्रियेत आरएसएसची भूमिका किती महत्त्वाची आहे हे वेळोवेळी दिसत आलं आहे. आता महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत पेच निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर संघाचा धावा केला आहे.
शिवसेना मुख्यमंत्रीपदासह 50-50 च्या आपल्या फॉर्म्युल्यावर ठाम आहे. त्यामुळे आता संघप्रमुख मोहन भागवत हे ही कोंडी कशी फोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये ठिणगी पडलेली असताना भागवत यांच्या मध्यस्थीचा किती परिणाम होणार याबद्दलही तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, या सर्व प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.