कोल्हापूरचा आढावा : लोकसभा झाली, आता विधानसभेला कुणाचं काय-काय ठरलंय?

कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 10 मतदारसंघ आहेत. त्यापैकी 6 शिवसेनेकडे, 2 भाजपकडे आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. म्हणजे मोदींनी घोषणा केल्याप्रमाणं कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसमुक्त झाला आहे.

कोल्हापूरचा आढावा : लोकसभा झाली, आता विधानसभेला कुणाचं काय-काय ठरलंय?
Follow us
| Updated on: Aug 01, 2019 | 5:39 PM

कोल्हापूर : गेल्या चार साडे – चार वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचं राजकीय वजन चांगलंच वाढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तर ते आणखी वाढलं आहे. कारण भाजपने चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्याला अधिक महत्व येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दोन खासदार आहेत. दोन्हीही जागा यंदा शिवसेनेने जिंकल्या. तर कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 10 मतदारसंघ आहेत. त्यापैकी 6 शिवसेनेकडे, 2 भाजपकडे आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. म्हणजे मोदींनी घोषणा केल्याप्रमाणं कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसमुक्त झाला आहे. कोल्हापूर महापालिका सोडली तर सर्वच ठिकाणी शिवसेना-भाजपनं सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळं जिल्ह्यात काँग्रेसला कमबॅक करण्यासाठी खूप धडपडावं लागणार आहे.

विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा

1) कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ (Kolhapur South Vidhan Sabha)

कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात हाय-टेन्शन मतदार संघ म्हणून कोल्हापूर दक्षिण (Kolhapur South) या मतदार संघाकडे पाहिलं जातं. कारण याठिकाणी पारंपरिक शत्रू असलेले महाडिक गट आणि सतेज पाटील (Satej Patil) गट समोरासमोर असतील . 2014 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐनवेळी उमेदवारी दिलेले अमल महाडिक यांनी तत्कालिन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा पराभव करत मोठा धक्का दिला होता.

भाजपमध्ये प्रवेश करुन अवघ्या काही दिवसात अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी चमत्कार करुन दाखवला होता. त्यातूनच महाडिक आणि पाटील गटाचं राजकीय शत्रूत्व शिगेला पोहोचलं. धनंजय महाडिक यांना 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत मदत करुनदेखील विधानसभेला महाडिक यांनी धोका दिल्याचा आरोप सतेज पाटील यांचा आहे. त्याचाच हिशेब सतेज पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंय म्हणत चुकता केला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांचा पराभव झाला.

आता पुन्हा दक्षिणमधून सतेज पाटील यांनी दंड धोपटले आहेत. त्यामुळं कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटील विरुद्ध अमल महाडिक अशी लढत होऊ शकते. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. 2014 मध्ये आमदार अमल महाडिक यांना 1,05,489 मतं मिळाली होती. तर पराभूत सतेज पाटील यांना 96,961 मतं मिळाली होती.

2) कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ  (Kolhapur North Vidhan Sabha)

कोल्हापूर शहराचा संपूर्ण भाग असलेला हा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सलग दोन वेळा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. 2014 मध्ये राजेश क्षीरसागर यांनी काँग्रेसचे उमेदवार सत्यजित कदम यांचा पराभव केला. त्यांना 69,736 मतं मिळाली होती, तर कदम यांना 43,315 मतं मिळाली.

कोल्हापूर शहर हे नेहमी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत क्षीरसागर यांना पक्षातूनच विरोध होण्याची शक्यता आहे. त्यातच हा मतदारसंघ शिवसेनेचा मित्रपक्ष असलेला भाजप मागण्याच्या तयारीत आहे. या ठिकाणी शिवसेनेचे दोन गट आहेत. एक म्हणजे राजेश क्षीरसागर आणि दुसरा म्हणजे संजय पवार यांचा. त्यामुळं क्षीरसागर यांना यावेळची निवडणूक सोप्पी राहिलेली नाही.

3) कागल विधानसभा मतदारसंघ (Kagal Vidhan Sabha)

संपूर्ण जिल्ह्याचं राजकीय विद्यापीठ म्हणून कागलकडे पाहिलं जातं. याठिकाणी पक्षापेक्षा व्यक्तीकेंद्रीत गटाचं राजकारण चालतं. सध्या याठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आहेत. त्यांनी 2014 मध्ये शिवसेनेचे संजय घाटगे यांचा पराभव केला. त्यावेळी मुश्रीफ यांना 1,23,626 मतं मिळाली होती, तर घाटगे यांना 1,17,697 मतं मिळाली होती. मात्र आता या संघाचं रुपडं पालटलं आहे. कारण खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी समरजितसिंह घाटगे यांना तयारीला लागण्यास सांगितलं आहे. त्यामुळं ही जागा भाजप मागू शकते.

समरजित सिंह यांनी देखील गेल्या चार वर्षांपासून कामाचा धडका लावला आहे. त्यामुळंच मुश्रीफ आणि समरजितसिंह यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत आहेत. जर ही जागा भाजपच्या वाट्याला गेली तर भाजप समरजितसिंह यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रय़त्न करणार आहे. कारण मुश्रीफांचा पराभव केला तर जिल्ह्यात भाजपला विरोध करणारं राष्ट्रवादीचं कोणी उरणारच नाही.

4) राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघ (Radhanagari  Bhudargad Vidhan Sabha)

 कोल्हापूर जिल्ह्यातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा असलेला हा मतदारसंघ आहे. राधानगरी, भुदरगड आणि आजरा तालुक्यातील काही भाग यामध्ये सहभागी आहे. याठिकाणी शिवसेनेचे आमदार प्रकाश अबिटकर यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार के पी पाटील यांच्या हॅट्रीक रोखून विजय मिळवला होता. 2014 मध्ये अबिटकर यांना 1,32, 465 मतं मिळाली होती तर पाटील यांना 93,077 मतं मिळाली होती. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्याच नेत्यांमध्ये एकमत नाही. कारण के पी पाटील यांचे नातलग ए वाय पाटील देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत. याच मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव राहूल यांना भाजपात घेऊन तिकिट देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळं युती झाली तर याठिकाणी मोठा पेच निर्माण होऊ शकतो.

5) चंदगड विधानसभा मतदारसंघ (Chandagad Vidhan Sabha)

 स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या बांधणीमुळं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हक्काचा मतदारसंघ मानला जातो. सध्या याठिकाणी बाबासाहेब यांच्या पत्नी संध्यादेवी कुपेकर आमदार आहेत. मात्र त्यांना आव्हान आहे ते त्यांच्याच घरातून. म्हणजे संग्राम कुपेकर यांच्याकडून. शिवसेनेकडून संग्राम कुपेकर यांनी जोरदार तयारी केली आहे. त्याच वेळी संध्यादेवी कुपेकर या निवडणूक लढवणार की कन्या नंदाताई बाभुळकर यांना उभा करणार हे अजून स्पष्ट झालं नाही. गेल्या निवडणुकीत संध्यादेवी कुपेकर यांना ५१,५९९ मतं मिळाली होती तर नरसिंग पाटील यांना ४३,४०० मतं मिळाली होती. आता मात्र या मतदार संघात शिवसेनेनं चांगली बांधणी केली आहे. जर नंदाताई बाभुळकर यांना विधानसभेचं तिकीट मिळालं तर याठिकाणी काँटे की टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

6) शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ (Shahuwadi Vidhan Sabha)

2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सत्यजित आबा पाटील यांनी विनय कोरे यांचा काही मतांनी पराभव करुन मोठा धक्का दिला. २०१४ मध्ये पाटील यांना ७४,७०२ मतं तर कोरे यांना ७४,३१४ मतं मिळाली होती. या मतदारसंघात मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण कोरेंचा जनसुराज्य पक्ष हा भाजपचा घटकपक्ष बनला आहे. त्यामुळं याठिकाणी कोरेंना तिकीट द्यायची की शिवसेनेच्या विद्यमान आमदारांना थांबवायचं असा प्रश्न उपस्थित होतोय. शिवसेना आपला सिटिंग आमदार सोडणार नाही आणि कोरे हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.त्यामुळं मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यातून भाजप कसा मार्ग काढतात हे पाहाव लागेल.

7) करवीर विधानसभा मतदारसंघ (Karveer Vidhan Sabha)

काँगेसचे प्रदेशउपाध्यक्ष पी. एन. पाटील यांचा हक्काचा मतदार संघ मानला जायचा. मात्र गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत चंद्रदीप नरके यांनी शिवसेनेच्या उमेदवारीवर याठिकाणी भगवा फडकवला आहे. दोन्ही वेळेला पी. एन. पाटील अवघ्या काही मतांनी पराभूत झाले आहेत. २०१४ मध्ये नरके यांना १,०७, ९८८ तर पी. एन यांना १, ०७, २८८ मतं मिळाली आहेत. यावेळी पुन्हा या दोन्ही नेत्यांमध्येच लढत होणार आहे. दोन्ही नेते तुल्यबळ असल्यानं नरके हॅट्रिक साधतात की पी. एन कमबॅक करतात हे पाहाव लागेल.

8) हातकणंगले विधानसभा मतदारसंघ (Hatkanangle Vidhan Sabha)

हातकणंगले विधानसभा मतदार संघात सलग दोन वेळा शिवसेनेचा भगवा फडकवण्यात डॉ. सुजित मिणचेकर यांना यश आलं आहे. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसचे जयवंत आवळे यांचा पराभव केला. मिणचेकर यांना ८९,०८७ मतं मिळाली होती तर त्यावेळी आवळे यांना ५९,७१७ मतं मिळाली होती. या मतदार संघात भिमशक्ती आणि शिवशक्ती याची ताकद एकत्र असल्यानं मिणचेकर यांनी दोनदा आमदारपद भूषवलं. आता त्यांच्या समोर २०१९ मध्ये कुणाचं आव्हान असेल हे अजून स्पष्ट झालं नाही.

9) इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ (Ichalkaranji Vidhan Sabha constituency)

काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत भाजपनं आपल्या ताब्यात आणला. काँग्रेसचे जिल्हाप्रमुख प्रकाश आवाडे यांचा सुरेश हाळवणकर यांनी पराभव करुन काँग्रेसला पिछाडीवर टाकले. त्यावेळी हाळवणकर यांना ९४,२९३ मतं मिळाली होती तर आवाडे यांना ८९,०३८ मतं मिळाली होती…मॅन्चेस्टर शहर म्हणून इचलकरंजीची ओळख आहे…हातमाग उद्योगावर इथलं राजकारण चालतं….या वेळी हाळवणकर आणि आवडे आमने-सामने असणार आहेत…मात्र भाजप याठिकाणी वाढल्याचं चित्र आहे…कारण सध्या इचलकरंजीवर सत्ता देखील भाजपचीच आहे.

10) शिरोळ विधानसभा मतदारसंघ (Shirol Vidhan Sabha constituency)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद असलेला हा मतदारसंघ आहे. मात्र याठिकाणी शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे. २०१४ मध्ये स्वाभिमानीतून बाहेर पडून उल्हास पाटील यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. स्वाभिमानीची सगळी आंदोलन अंगावर घेतलेला साधा माणूस म्हणून उल्हास पाटील यांच्याकडे पाहिलं जातंय. मात्र २०१४ मध्ये त्यांनी स्वाभिमानीच्या उमेदवाराबरोबरच राष्ट्रवादीच्या उमेदवारावर विजय मिळवला. त्यावेळी पाटील यांना ७०,८०९ मतं मिळाली तर दोन नंबरची मत राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना ५०,७७७ मतं मिळाली. या मतदार जातीय राजकारण मोठ्या प्रमाणात चालवलं जातं. त्यामुळं आगामी विधानसभेला कुणाची ताकद दिसून येतं हे पाहावं लागेल.

कोल्हापुरातील पक्षीय बलाबल (2014)

 एकूण विधानसभा मतदारसंघ – 10

  • शिवसेना – 6
  • भाजप – 2
  • राष्ट्रवादी – 2
  • काँग्रेस – 0

कोल्हापूर विद्यमान खासदार

  • कोल्हापूर लोकसभा – संजय मंडलिक (शिवसेना)
  • हातकणंगले लोकसभा – धैर्यशील माने (शिवसेना)
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.