Automatic Car : आपल्या साध्या कारला पण लावा की ऑटोमॅटिकचे पंख, इतका येईल खर्च
Automatic Car: ऑटोमॅटिक कारचे फीचर तुम्हाला साध्या कारला बसवायचे आहे का? त्यामुळे मॅन्युअल कार पण ऑटोमॅटिक होऊ शकते का, त्यासाठी किती खर्च येईल, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतील, तर चला शोधुयात..
नवी दिल्ली | 12 सप्टेंबर 2023 : भारतात कोणत्याही शहरात जा, वाहतूक कोंडी नित्याचीच बाब आहे. लहान-मोठ्या कोणत्याही शहरात कार चालवणे अवघड आहे. जर तुम्ही कारने जात असाल तर सतत गिअर बदलण्याची झंझट पाठ सोडत नाही. मॅन्युअल कारमध्ये (Manual Car) सर्वात मोठी अडचण सातत्याने गिअर बदलणे हीच असते. पण मॅन्युअल कार असेल तर ही समस्या कमी होते. त्यासाठी कारची तिचे तंत्रज्ञान खर्ची घालते. तुम्हाला डोक्याला ताप घ्यायची गरज नसते. अनेकांना त्यांची मॅन्युअल कार ऑटोमॅटिक (Convert Manual Car to Automatic) करता येते का, असा प्रश्न पडतो. जर कार ऑटोमॅटिक करता येत असेल तर त्यासाठी किती खर्च करावा लागेल, हा प्रश्न पण ओघाने येतोच. किती येत असेल बरं या करामतीसाठी खर्च?
हे काही सोप्प काम नाही
तुम्हाला वाटत असेल एखादं किट बसवलं की झालं कामं. तर वाटतं तितकं हे काम सोप्प अजिबात नाही. मॅन्युअल गिअरबॉक्सच्या ऐवजी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स बसवत असाल तर सध्याचा गिअरबॉक्स काढावा लागेल. त्यामुळे घरच्या घरी, मित्राच्या मदतीने हे काम करण्याचा अचाट प्रयोग करु नका. त्यासाठी एखाद्या चांगल्या मॅकेनिकची गरज लागेल. अनुभवी मॅकेनिककडून हे काम करुन घेणे फायदेशीर ठरेल.
कशी तयार होईल ऑटोमॅटिक कार
ऑटोमॅटिक कार तयार करण्यासाठी तुम्हाला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन किट खरेदी करावी लागेल. तुमच्या कार मॉडेलनुसार, त्यासंबंधीचे दुसरे पार्टस पण खरेदी करणे आवश्यक आहे. मॅन्युअल कडून ऑटोमॅटिक कारमध्ये बदल करण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला कार सहज धावण्याचा अनुभव घेता येईल. या किटमुळे तुमच्या कारची रिसेल व्हॅल्यू पण वाढेल.
या पार्ट्सची लागेल गरज
कारच्या ऑटोमॅटिक बदलासाठी बाजारात किट उपलब्ध आहे. त्याशिवाय इतर वस्तूंची गरज लागेल.
- नवीन ऑटोमॅटिक ट्रान्समिशन
- नवीन टॉर्क कन्व्हर्ट
- नवीन ड्राईव्हशॉफ्ट
- शिफ्टर आणि लिंकेजसाठीच्या वस्तू
- इलेक्ट्रिक सिस्टमशी जोडण्यासाठी वायरिंग
किती येईल खर्च
मॅन्युअल ते ऑटोमॅटिक कार असा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी खर्च येईल. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन साठी कार मॉडेलनुसार खर्च लागेल. अनुभवी मॅकेनिक त्याची किंमत सांगेल. त्यात त्याची मजुरी किती हे अगोदरच विचारुन घ्या. चांगल्या क्वालिटीचे कार पार्टस खरेदी करणे आवश्यक आहे. एका अंदाजानुसार, ऑटोमॅटिक कार तयार करण्यासाठी ग्राहकाला कमीत कमी 50,000 रुपयांचा खर्च येऊ शकतो.
तज्ज्ञांचा सल्ला पण ऐका
तज्ज्ञांच्या मते, मॅन्युअल कार ऑटोमॅटिक कारमध्ये बदलण्याची घाई अजिबात करु नका. वाहन क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या. कारण असे करणे जोखिमेचे ठरु शकते. तुमच्या कारला त्यामुळे नुकसान होऊ शकते. यामुळे कारची वॉरटी संपू शकते. तसेच अंदाजित खर्चापेक्षा यासाठी अधिक खर्च करावा लागू शकतो. त्यापेक्षा नवीन ऑटोमॅटिक कार खरेदी फायदेशीर राहील, तज्ज्ञांचा सल्ला आहे.